कलावंतांनी कलेची साधना निरंतर करावी :राम सुतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 08:26 PM2019-02-04T20:26:50+5:302019-02-04T20:31:32+5:30
कला कुठलीही असो, कलावंतांनी जर तिची साधना निरंतर केल्यास, ती कला तुम्हाला शिखरावर घेऊन जाते. चित्रकलेच्या बाबतीतही चित्रकाराने सातत्य ठेवल्यास एक अशी वेळ येते, जेव्हा त्याच्या एका स्ट्रोकमधूनही उत्कृष्ट पेंटिंग उभे राहते, असा मार्गदर्शनपर सल्ला प्रसिद्ध शिल्पकार, पद्मश्री, पद्मविभूषण राम सुतार यांनी युवा कलावंतांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कला कुठलीही असो, कलावंतांनी जर तिची साधना निरंतर केल्यास, ती कला तुम्हाला शिखरावर घेऊन जाते. चित्रकलेच्या बाबतीतही चित्रकाराने सातत्य ठेवल्यास एक अशी वेळ येते, जेव्हा त्याच्या एका स्ट्रोकमधूनही उत्कृष्ट पेंटिंग उभे राहते, असा मार्गदर्शनपर सल्ला प्रसिद्ध शिल्पकार, पद्मश्री, पद्मविभूषण राम सुतार यांनी युवा कलावंतांना दिला.
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे चौथ्या लॅण्डस्केप पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत करण्यात आले आहे. सोमवारी प्रदर्शनाचे उद्घाटन राम सुतार यांच्याहस्ते झाले. यावेळी लोकमत एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट व शिल्पकार अनिल सुतार, उद्योगपती किरीट भंसाली व प्रसिद्ध निसर्गचित्रकार हेमंत मोहड उपस्थित होते. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे कुवांरा भिवसेने येथे पेंटिंगचे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात वॉटर कलरमध्ये उत्कृष्ट लॅण्डस्केप तयार करणाऱ्या कलावंतांच्या पेंटिंगचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनात लावण्यात आलेल्या पेंटिंगमध्ये कलावंतांनी निसर्ग, ग्रामीण जीवन, पुरातन मंदिर, ओढे, टेकड्या, तळ्याचा काठ, सूर्योदयाच्या छटा, ग्रामीणमधील बाजारहाट साकारला आहे. राम सुतार यांनी या सर्व पेंटिंगचे अवलोकन करून, कलावंतांच्या कुंचल्यातून वॉटर कलरचा प्रवाह हा निरंतर वाहत रहावा, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अनिल सुतार म्हणाले की, जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी नवीन कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे.
यावेळी उत्कृष्ट पेंटिंग साकारणाऱ्या कलावंतांना पुरस्कृत करण्यात आले. यात प्रशांत चिरकुटे, श्रीपाद भोंगाडे, राजू भूईकर, सुबोध कथळे, पुलकित मिरासे, रोशन इंगोले, नंदकिशोर साळवकर, स्वप्निल शिऊरकर, सुमित्र ब्राम्हणकर यांचा समावेश आहे. तसेच यावेळी विजय काकडे, हेमंत मोहोड, प्रफुल्ल तायवाडे, विजय अनिसकर, प्रवीण ढेंगे, गोविंद परांडे, नीलेश भारती, रणजित वर्मा या वरिष्ठ कलावंताचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अमित गोनाडे यांनी केले.
कलाक्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको
विदर्भ असो की महाराष्ट्र या भूमीने दर्जेदार कलावंत दिले आहेत. तरीपण कलाक्षेत्रात एक पातळी गाठण्यासाठी महाराष्ट्रातील कलावंतांना संघर्ष करावा लागतो आहे. कारण कलेच्या क्षेत्रातही राजकीय हस्तक्षेप आहे. या क्षेत्राने राजकीय हस्तक्षेपातून बाहेर पडणे गरजेचे आहे, असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.