विदर्भातील कलावंतांची ख्याती जगभर व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:27 AM2018-07-22T01:27:32+5:302018-07-22T01:28:22+5:30
विदर्भ ही कलावंतांची खाण आहे. येथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. व्हाईस आॅफ विदर्भ या स्पर्धेच्या माध्यमातून अशा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पुढे येणाऱ्या कलावंतांची ख्याती जगभर व्हावी, अशी महापालिकेची प्रामाणिक भूमिका असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ ही कलावंतांची खाण आहे. येथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. व्हाईस आॅफ विदर्भ या स्पर्धेच्या माध्यमातून अशा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पुढे येणाऱ्या कलावंतांची ख्याती जगभर व्हावी, अशी महापालिकेची प्रामाणिक भूमिका असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी केले.
नागपूर महापालिका व लकी इव्हेन्टस अॅण्ड म्युझिकल एन्टरटेन्मेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस सोल्युशन्स अॅन्ड सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘व्हाईस आॅफ विदर्भ’स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शनिवारी अमृत भवन येथे सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी महापौर बोलत होत्या. यावेळी महापालिकेचे क्रीडा सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ कलावंत योगेश ठक्कर, पं. जयंत इंदूरकर, सुनील वाघमारे, सारंग जोशी, प्रदीप गोंडाणे, मनिषा देशकर, हर्षल हिवरखेडकर उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या, आजचे युग हे रियालिटी शो चे युग आहे. पण विदर्भातील प्रत्येक कलावंत अशा शो मध्ये पोहचू शकत नाही. अशा कलावंतांना आपल्या शहरात हक्काचे व्यासपीठ देऊन मुंबईपर्यंत पोहचविणे असा या स्पर्धा आयोजनामागचा हेतू आहे. यातून विदर्भाला उदयोन्मुख गायक कलावंत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी महापौर यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर योगेश ठक्कर, पं. जयंत इंदूरकर आदी ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात आला. संचालन लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान यांनी केले.
आजही रंगणार प्राथमिक फेरी
२२ जुलैला रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात प्राथमिक फेरी रंगणार आहे. शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून प्राथमिक फेरीला कलावंतांनी उपस्थिती लावली. दोन फेऱ्यांमध्ये कलावंतांनी आपल्या गायकीने परिक्षकांना मंत्रमुग्ध केले. १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील अशा दोन गटात ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये तर ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. ४ आॅगस्टला सुरेश भट सभागृहात अंतिम फेरी होणार आहे.