अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा

By admin | Published: December 27, 2015 03:28 AM2015-12-27T03:28:45+5:302015-12-27T03:28:45+5:30

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘क्लीन चिट’ दिली असली तरी ...

Arun Jaitley resigns | अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा

अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा

Next

तारिक अन्वर : लोकमत भवनला सदिच्छा भेट
नागपूर : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘क्लीन चिट’ दिली असली तरी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर यांनी मात्र जेटली यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
खा. तारीक अन्वर यांनी शनिवारी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अन्वर यांनी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा केली.
दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर भाजपचेच खासदार कीर्ती आझाद यांनी जाहीररीत्या आरोप केले आहेत. या आरोपामुळे सध्या भाजपसह संपूर्ण देशात वादळ उठले आहे. भाजपने तडकाफडकी आजाद यांना पक्षातून निलंबित केले आहे.
यासंदर्भात अन्वर यांचे मत विचारले असता त्यांनी जेटली यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे, असे स्पष्ट केले. लोकमतच्यावतीने गुरुवारी पुणे येथे आयोजित शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात पवार यांनी मात्र जेटली यांना क्लीन चिट दिल्याचे अन्वर यांच्या लक्षात आणू दिले असता, क्रिकेटशी संबंधित असल्याने ते पवार यांचे मत असू शकते परंतु जेटलींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे, असे माझे मत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जेव्हाही निवडणुका असतात विशेषत: उत्तर प्रदेशच्या निवडणुका असल्या की, वर्षभरापूर्वी भाजप आणि त्यांच्या सहयोगी संघटना या कुठला ना कुठला मुद्दा उपस्थित करीत असतात, असा आरोप करीत भाजपा हटाव हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या एकच नारा असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांचा खेळ बिहारच्या निवडणुकीमध्येच संपला आहे. ते भाजपाला वाढवत आहे, अशी धारणा आता सामान्यजनात बनू लागली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुनाफ हकीम आणि अजय पाटील उपस्थित होते.(प्रतिनिधी)

पंतप्रधानांच्या पाकिस्तान भेटीचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या आकस्मिक भेटीमुळे सध्या देशात वादळ उठले आहे. विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहेत. परंतु तारिक अन्वर यांनी मात्र पंतप्रधानांच्या पाकिस्तान भेटीचे स्वागत केले आहे. मोदी यांची पाकिस्तान भेट ही चांगली सुरुवात आहे. आपले संबंध मजबूत करण्यासाठी अशाच काही चांगल्या संधी असतात. परराष्ट्रीय धोरणात दोन पंतप्रधानांमधील व्यक्तिगत संबंध हे खूप महत्त्वाचे ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Arun Jaitley resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.