अरुण काकडे यांच्या निधनाने नागपुरातील रंगकर्मी हेलावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:03 PM2019-10-09T23:03:25+5:302019-10-09T23:08:06+5:30
मराठी रंगभूमीसाठी सतत धडपडणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या निधनाने हौशी, समांतर अशा प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्यांना धक्काच बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी रंगभूमीसाठी सतत धडपडणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या निधनाने हौशी, समांतर अशा प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्यांना धक्काच बसला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपापल्या गावामध्ये नाट्य चळवळ रुजविण्याचा प्रयत्न केला होता. अशा रंगकर्मीच्या अचानक जाण्याने अनेकांचे मन हेलावले आहे.
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नागपुरातही नाट्य चळवळ राबविली जाते, याचा त्यांना आनंद होता. त्याच कारणाने संजय भाकरे फाऊंडेशनच्या दरमहा एकांकिका चळवळीला भेट देऊन त्यांनी उपक्रमांची स्तुती केली होती. ‘आविष्कार’ ही संस्था उभारून त्यांनी अशाच प्रकारे नाट्य चळवळ सुरू केली आणि दुर्लक्षित नाटकांना व नटांना उभारी दिली होती. नागपुरातही अशा चळवळी सुरू आहेत, याबद्दल त्यांना कमालीची आस्था होती.
दोन तासांच्या बैठकीत या माणसाने हृदयात जागा निर्माण केली - संजय भाकरे
अरुण काकांच्या जाण्याने जणू आमच्या नाट्य चळवळीचा आधारच गेल्याची मनस्थिती आमची झाली आहे. आमच्या फाऊंडेशनला त्यांनी भेट दिली. आमची चळवळ बघून त्यांना कै. अरविंद आणि सुलभाताई देशपांडे यांचे स्मरण झाल्याचे ते म्हणाले होते. आता थांबायचे नाही, तर पुढे चालायचे. नटेश्वर मागे उभा असतोच, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. केवळ दोन तासाच्या या बैठकीत त्यांनी माझ्या हृदयात अडिग अशी जागा निर्माण केल्याची भावना संजय भाकरे यांनी व्यक्त केली.
प्रायोगिक रंगभूमीवरचा आधारस्तंभ हरवला - मदन गडकरी
अरुण काकडे यांच्याशी माझा सततचा संवाद होता. ते आज गेले, याचा धक्काच बसला. प्रायोगिक रंगभूमीवरचे ते आघाडीचे रंगकर्मी होते. त्यांचे ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक १९८४-८५ साली झालेल्या नागपूर नाट्य संमेलनासाठी आणले होते. त्यावेळी ते स्वत:ही आले होते. छबिलदास नाट्य चळवळीतील त्यांनी अनेक नाटकांना व नटांना पुढे आणल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी यांनी सांगितले.
रंगभूमीचा निष्ठावंत हरवला - नरेश गडेकर
मराठी रंगभूमीवरचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी आपली भावना व्यक्त केली. अरुण काकडे यांनी कायम जमिनीवर राहून रंगभूमीची सेवा केली आहे. रंगकर्मींना नाट्यचळवळ म्हणून नाटकांची जाणीव करवून देण्यात, त्यांनी कमालीचे यश मिळविल्याचे गडेकर म्हणाले.
रंगभूमीसाठीचे त्यांचे काम प्रेरणास्रोत - महेश रायपूरकर
रंगभूमीसाठीचे त्यांचे काम पुढच्या पिढीसाठी कायम प्रेरणास्रोत राहणार आहे. त्यांनी प्रायोगिक नाटकासाठी चालविलेली नाट्यचळवळ अनेकांना उभारी देणारी ठरली. त्यांच्यामुळे अनेक कलावंत पुढे आले आणि अनेक दुर्लक्षित नाटकांना वावही मिळाला. त्यांचे कामच पुढच्या पिढीसाठी शिदोरी ठरणार असल्याची भावना ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर यांनी व्यक्त केली.
अरुणसारखा माणूस उभा करणे कठीण - रमेश अंभईकर
अरुण काकडे हे काम करणारे आणि रंगकर्मी घडविणारा रंगकर्मी होता. एखादा कलावंत एकवेळ उभा करता येईल, पण अरुणसारखा काम करणारा माणूस पुन्हा उभे करणे कठीण आहे. त्याचे जाणे मनाला चटका देऊन गेल्याची भावना ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश अंभईकर यांनी व्यक्त केली.