अरविंद भोळे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:37+5:302021-04-02T04:07:37+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निलंबित पोलीस निरीक्षक अरविंद विनायक भोळे यांना बलात्कार प्रकरणामध्ये सशर्त अंतरिम ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निलंबित पोलीस निरीक्षक अरविंद विनायक भोळे यांना बलात्कार प्रकरणामध्ये सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून भोळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी भोळे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ४९३, ४१९, ४२०, ३२३, ५०६ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी भोळे यांनी सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. फिर्यादी ४५ वर्षीय विधवा महिला असून तिला एक मुलगा आहे. भोळे यांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादीसोबत लग्न केले. त्यानंतर तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, शारीरिक संबंधांची छायाचित्रे काढली अशी पोलीस तक्रार आहे. भोळे यांच्यातर्फे ॲड. समीर सोनवणे यांनी कामकाज पाहिले. फिर्यादीने सहमतीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच, भोळे यांनी संबंधित छायाचित्रांचा दुरुपयोग केल्याचा फिर्यादीचा आरोप नाही असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता भोळे यांना दिलासा दिला.