कार्यकर्त्यांना 'केजरी बळ', उपराजधानीत 'आप'चे 'हौसले बुलंद'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 11:08 AM2022-05-09T11:08:48+5:302022-05-09T11:17:23+5:30
केजरीवाल यांनी जनसामान्यांच्या मुद्द्याला हात घालत त्यांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून गेलेल्या संदेशामुळे नागपुरातील ‘आप’ कार्यकर्त्यांचे ‘हौसले बुलंद’ झाले आहेत.
कमलेश वानखेडे
नागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल व पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या राज्यात केलेल्या विकासाचा आलेख रविवारी नागपूरकरांसमोर मांडला. केजरीवाल यांनी जनसामान्यांच्या मुद्द्याला हात घालत त्यांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून गेलेल्या संदेशामुळे नागपुरातील ‘आप’ कार्यकर्त्यांचे ‘हौसले बुलंद’ झाले आहेत. पहिल्यांदाच महापालिकेच्या रिंगणात उतरणार असलेल्या नव्या चेहऱ्यांना एक प्रकारे ‘केजरी बळ’ मिळाले आहे.
नागपूरच्या निवडणूक रिंगणात आपने दोनदा टेस्ट दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन उतरलेल्या अंजली दमानिया यांना ६९ हजार ८१ मते मिळाली होती. दमानिया यांच्या प्रचारासाठी कस्तुरचंद पार्कवर झालेल्या सभेचे यात मोठे योगदान होेते. २०१७ मधील नागपूर महापालिका व २०१९ ची लोकसभा आप लढली नाही. त्यामुळे नागपुरात आपची राजकीय पकड मजबूत होऊ शकली नाही. परिणामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर व रामटेक या दोन मतदारसंघात लढूनही दखलपात्र मते मिळाली नाहीत.
यावेळी नागपूर महापालिकेची निवडणूक ताकदीने लढण्यासाठी आपचे कॅडर कामाला लागले आहेत. पंजाबमध्ये सत्ता आल्यापासून नागपुरातील कार्यकर्ते जोशात आहेत. लोकमत सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी अरविंद केजरीवाल व भगवंत मान हे नागपुरात येणार असल्याचे कळल्यापासूनच आम आदमी पार्टीच्या नागपूर शहरातील कॅडरमध्ये उत्साह संचारला होता.
ज्याचे नाव घेऊन आपण गल्लीबोळातील प्रत्येक घरात जातो त्या नेत्याला जवळून पाहण्याची व प्रत्यक्ष ऐकण्याची संधी आपच्या कार्यकर्त्यांसाठी चालून आली होती. आपच्या कॅडरने या संधीचे सोने केले. केजरीवाल यांचे भाषण ऐकण्यासाठी वेळेपूर्वीच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सभागृहात जागा नसेल तर बाहेर बसून ऐकण्याची अनेकांची तयारी होती. प्रत्यक्षात केजरीवाल यांना पाहून व ऐकून आपचा कार्यकर्ता सुखावला व एक नवी ऊर्जा घेऊन सज्ज झाल्याचे केजरीवाल यांच्या भाषणानंतर पाहायला मिळाले.
२०१४ मध्ये नागपूर लोकसभेत प्राप्त मते : ६९०८१
२०१९ मध्ये विधानसभेत प्राप्त मते
दक्षिण-पश्चिम : १,१२५
रामटेक : ८३४
‘आप’चा राजकीय आलेख
- २०१४ मध्ये नागपूर लोकसभेत अंजली दमानिया लढल्या.
- २०१४ ची विधानसभा लढले नाही.
- २०१७ नागपूर महापालिका लढले नाही.
- २०१९ : महाराष्ट्रात लोकसभा लढले नाही.
- २०१९ : राज्यात विधानसभेच्या २५ जागा लढले. नागपुरात दक्षिण-पश्चिम व रामटेक या दोन जागा लढल्या.
- २०२२ : महापालिका निवडणूक लढणार