वर्षभरात तब्बल २५१ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया; राज्यात नागपूर दुसरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 12:05 PM2023-05-29T12:05:06+5:302023-05-29T12:14:38+5:30
६,८४,४०८ बालकांची आरोग्य तपासणी
नागपूर : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम योजना ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी संजीवनी ठरली आहे. २०२२-२३ या वर्षात नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५१ बालकांवर या योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्वाधिक हृदय शस्त्रक्रिया करणारे राज्यात नागपूर जिल्ह्याने दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकाविला आहे.
नागपुर जिल्हयातील ० ते १८ वयोगटातील संपूर्ण बालकांची आरोग्य तपासणी करून गरजू बालकांना आवश्यक त्या आरोग्यसेवा प्रदान करून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, व समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणता यावे हा राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे. याकरिता जिल्ह्यात एकूण ३८ आरोग्य तपासणी पथके कार्यान्वित आहेत.
- ६ वर्षांच्या आतील २,५६,८५१ बालकांची तपासणी
नागपुर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते ६ वर्ष वयोगटातील २ लाख ५६ हजार ८५१ तर, ६ ते १८ वर्षवयोगटातील ४,१८,५९३ अश्या एकूण ६,८४, ४०८ बालकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये आढळून आलेल्या आजारी बालकांना मोफत सेवा प्रदान केल्या जात आहेत.
- १,४९१ मुलांवर गंभिर व किरकोळ शस्त्रक्रिया
या योजनेतून हृदय शस्त्रक्रिया बरोबरच इतर ही गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत ऑर्थोपेडिक ८६, हायड्रोसिल ३१, हर्निया १२९, अपेंडिक्स ८०, क्लीप लीप पॅलेट ६१, स्कीट १३६, डेंटल १३७, ईएनटी ७७, किडणी १०, इतर ७२० अश्या एकूण १ हजार ४९१ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
- ४६,१०८ बालकांना मोफत संदर्भ सेवा
तपासणी अंती ४६ हजार १०८ बालकांना मोफत संदर्भसेवा देऊन त्यांच्या आवश्यक त्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
- उपचारासाठी पालकांनी काय करावे.
नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतगत सर्व उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालय स्तरावर आरोग्य तपासणी पथकांशी समन्वय साधावा. पुढील सर्व प्रक्रिया या पथकामार्फत पूर्ण करण्यात येतात तसेच, जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय तसेच अंगणवाडी सेविका व शाळेशी संपर्क साधावा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम जिल्हा समन्वयक म्हणून अमोल खोब्रागडे राबवित आहेत.
- हजारो बालकांना मोफत आरोग्य सेवा
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हा अधिक लोकाभिमुख करून जिल्ह्यातील कोणताही बालक आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्व बालकांपर्यंत हा कार्यक्रम पोहचविला जात आहे. या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून हजारो बालकांना मोफत आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक नागपूर