राज्यात तब्बल ४,२०० कोटींवर चलान प्रलंबित; बहुतेक चालकांकडून लोकअदालतीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 07:39 AM2024-03-14T07:39:33+5:302024-03-14T07:39:40+5:30
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘लोकमत भवन’ येथे सदिच्छा भेट दिली व वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून ई-चलान कारवाई केली जाते; पण बहुतांश घटनांमध्ये वाहनचालक त्यांचे ई-चलान भरत नाहीत, असे चित्र आहे. महाराष्ट्रात ४२०० कोटींहून अधिक रकमेची चलान प्रलंबित आहेत, अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. मंगळवारी डॉ. सिंगल यांनी ‘लोकमत भवन’ येथे सदिच्छा भेट दिली व वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपुरात येण्याअगोदर सिंगल हे राज्याचे अतिरिक्त महासंचालक (वाहतूक) होते. त्यांच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली.
काय म्हणाले डॉ. सिंगल
- रहदारीचे नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. मात्र, तरीही वाहतूक पोलिसांची तैनात करण्याची गरज पडते.
- जागरूक नागरिक या नात्याने आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत, ज्या आपण चांगल्या प्रकारे पार पाडल्या पाहिजेत.
- सिग्नल लाल असेल तर वाहतूक पोलिसाची गरजच काय आहे.
- पोलिसांनी दंडुके घेऊन नियमांचे पालन करून घेणे हा या प्रश्नावरचा उपाय नाही, असे ते म्हणाले.