शिक्षण विभागात तब्बल ४०० बोगस नियुक्त्या ? चौकशी समिती गठित करणार
By गणेश हुड | Published: June 27, 2024 08:34 PM2024-06-27T20:34:31+5:302024-06-27T20:34:53+5:30
प्रत्येकी चार ते पाच लाख घेतल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हयात नसलेले जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून मागील तारखांत आदेश देवून शिक्षण विभागात तब्बल ४०० शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. या बोगस नियुक्ती आदेशाला शालार्थ आयडी सुध्दा देण्यात आला. याबाबतचा रेकॉर्ड प्राप्त होताच या प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याने या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
बोगस नियुक्तीसाठी प्रत्येकी चार ते पाच लाखांची रक्क्म घेवून शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. स्थायी समितीने नियुक्त्याबाबतचा रेकॉर्ड शिक्षण विभागाला मागीतला आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले जाणार असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे या काळातील आवक-जावक रजिष्टर शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात सहभागी कर्मचाऱ्यांनी हे रजिष्टर गहाळ केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे शासन मंजुरी नसतानाही संस्था चालकांनी या बोगस नियुक्त्यांच्या आधारे मागील काळातील शासनाचे कोट्यवधी रुपयांचे वेतन अनुदान लाटले आहे. यासाठी शिक्षण विभागात रॅकेट सक्रीय असून यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा आहे. प्रकरण दडपण्यासाठी काही संस्थाचालक कामाला लागल्याची चर्चा आहे.
अधिवेशनात मुद्दा उपस्थित करा : नागो गाणार यांची मागणी
शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्यांत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे. दुसरीकडे शासनाचे कोट्यवधीचे वेतन अनुदान लाटण्यात आले आहे. हा गंभीर मुद्दा असल्याने याबाबतचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेनात उपस्थित करावा, अशी मागणी माजी आमदार नागो गाणार यांनी आमदार चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. तर त्यांनी शिक्षण सचिवांकडे एसआयटी चौकशीची मागणी केली आहे