जिल्हा परिषदेच्या तब्बल ५१ शाळांत शिक्षकच नाही; शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2023 09:48 PM2023-06-08T21:48:56+5:302023-06-08T21:50:56+5:30
Nagpur News जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची ७८५ पदे रिक्त आहेत, तर ५१ शाळांत शिक्षकच नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची ७८५ पदे रिक्त आहेत, तर ५१ शाळांत शिक्षकच नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दावा कसा करू शकतो, असा सवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.
जि.प.च्या शिक्षण समितीची बैठक बुधवारी सभापती राजू कुसुंबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदस्या शांता कुमरे यांनी त्यांच्या सर्कलमध्ये २५ शिक्षकांची कमतरता असल्याने नाराजी व्यक्त केली. आपले सर्कल दुर्गम भागात असताना प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक होते; परंतु शिक्षक भरतीचे कारण पुढे केले जाते. त्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसतो आहे. एकीकडे शाळेतील पटसंख्या कमी होत असताना जिथे चांगली पटसंख्या आहे, तिथे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार, असा सवाल त्यांनी केला. सरकार जोपर्यंत शिक्षकभरती करणार नाही, तोपर्यंत कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या करा, यासाठी १.५० कोटींची तरतूद करण्याची मागणी सदस्यांनी केली. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जि.प.च्या सुमारे १५१५ शाळा आहेत. जवळपास ७३ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. ४५००वर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु आज घडीला या ठिकाणी तीन हजार ७९४ शिक्षक कार्यरत आहेत.
सर्वाधिक रिक्त पदे असलेले तालुके
रामटेक १९३, मौदा ११०, पारशिवनी ५७, नरखेड १०८
एकही शिक्षक नसलेल्या शाळा
तालुका शाळा- हिंगणा ३, कळमेश्वर २, मौदा ५, उमरेड ४, भिवापूर ४, नरखेड ९, काटोल ४, रामटेक ४, सावनेर ४, कुही ९, पारशिवनी ३