देव तारी त्याला कोण मारी! ट्रेनमधून पडताच देवदूत धावला अन् जीव वाचला; नागपुरातील घटना
By नरेश डोंगरे | Published: August 29, 2023 07:44 PM2023-08-29T19:44:08+5:302023-08-29T19:44:42+5:30
मुंबईसाठी निघालेल्या दुरंतो एक्सप्रेसने गती घेतली अन् आतमध्ये असलेली एक शाळकरी मुलगी लगबगीने खाली उतरण्यासाठी डब्याच्या दाराकडे धावली.
नागपूर : मुंबईसाठी निघालेल्या दुरंतो एक्सप्रेसने गती घेतली अन् आतमध्ये असलेली एक शाळकरी मुलगी लगबगीने खाली उतरण्यासाठी डब्याच्या दाराकडे धावली. फलाटावर पाय ठेवण्याचा तिचा अंदाज चुकला अन् तीचा पाय ट्रेन तसेच फलाटाच्या गॅपमध्ये शिरला. काय आक्रित घडणार, याची कल्पना आल्याने फलाटावरील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, वेळीच एक देवदूत धावला. या देवदुताने तिला मृत्यूच्या जबड्यातून अलगड ओढून घेतले. काही क्षणांचीच वेळ होती मात्र देवदूत बनून धावलेल्या जवाहर सिंह नामक रेल्वे कर्मचाऱ्याने मृत्यूचा डाव हाणून पाडल्यामुळे त्या मुलीला जीवदान मिळाले.
ही घटना सोमवारची आहे. नागपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी १२२९० नागपूर - मुंबई दुरांतो एक्सप्रेस रात्री ८.२० ला तयार होती. फलाट क्रमांक ८ वर लागलेल्या या गाडीत सोनाली (वय ३५) नामक महिला प्रवास करणार होती. त्यांना सोडण्यासाठी नातेवाईक पल्लवी (वय ३५) आणि त्यांची मुलगी निधी (वय १४) आल्या होत्या. सोनाली यांचे सामान डब्यात सीटपर्यंत पोहचविण्यासाठी पल्लवी आणि निधीही गाडीत चढल्या. दरम्यान, नियोजित वेळेला गाडी फलाटावरून सुटली. त्यामुळे निधी लगबगीने डब्याच्या दाराकडे धावली.
घाईगडबडीत फलाटावर पाय ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या निधीचा पाय सरळ गाडी आणि फलाटाच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये गेला. यावेळी आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेले तसेच दुसऱ्या गाडीच्या प्रतिक्षेत अनेक प्रवासी फलाटावर उभे होते. त्यांनी निधीला दारातून खाली उतरताना बघितले. काय होणार, हे लक्षात आल्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. यावेळी फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान जवाहर सिंह आपले कर्तव्य बजावत होते. त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता विलक्षण गतीने निधीकडे झेप घेतली अन् तिला अलगड आपल्याकडे ओढून घेतले. फलाटावरचे काही प्रवासीही यावेळी धावले आणि त्यांनीही जवाहर यांना मदत केली. दुरांतो एक्सप्रेस धडधडत निघून गेली मात्र अनेकांच्या खास करून निधी आणि तिच्या आईच्या काळजाची धडधड सुरूच होती.
जिवघेणा निष्काळजीपणा
अशा घटना वारंवार अनेक ठिकाणी घडतात. काही जणांचे त्यामुळे प्राण जातात तर नशिब बलवत्तर असलेले काही जण बचावतात. त्या संबंधाने प्रसारमाध्यमांत वेळोवेळी वृत्तही येते. तरीसुद्धा अनेक जण हा जीवघेणा निष्काळजीपणा करतात. गाडीची वेळ झाल्यानंतर, गाडीचा भोंगा वाजल्यानंतरही अनेक जण गप्पाटप्पा करत असतात आणि गाडी सुटल्यानंतर धावपळ करीत गाडीत चढण्या-उतरण्याचा प्रयत्न करतात. या घटनेत सुदैवाने जवाहर देवदूत बणून आल्याने निधीचा जीव वाचला. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी जवाहर यांचे अभिनंदन केले आहे.