मनपा निवडणूक लांबणीवर पडताच दावेदार पडले थंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 10:32 AM2022-03-10T10:32:26+5:302022-03-10T10:37:28+5:30
प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होताच एप्रिल-मे मध्ये निवडणूक होईल. असा अंदाज होता. मात्र ओबीसी आरक्षणाचा विचार करता राज्य सरकारने विधेयक सादर करून प्रभाग रचनेचे प्रारुप रद्द केले आहे.
नागपूर : महापालिका निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता गृहीत धरून दावेदार व इच्छुक तयारीला लागले होते. मात्र निवडणूक लांबणीवर पडण्याची चर्चा सुरू होताच दावेदार थंड पडले आहेत.
कार्यकाळ पूर्ण करणारे काही नगरसेवक व मोजकेच नेते प्रभागात सक्रिय दिसत आहेत. दुसरीकडे आमदार, मंत्री यांचे होर्डिंग व बॅनर लावून उमेदवारीचा दावा करणारे एसीमध्ये बसून वेळ घालवत आहेत. मात्र ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. पक्षाकडून संकेत मिळालेले भाजप, काँग्रेससह अन्य पक्षातील इच्छुक तयारीला लागले आहेत. घराघरात पोहचण्यासाठी मोहीम आखली जात आहे.
प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होताच एप्रिल-मे मध्ये निवडणूक होईल. असा अंदाज होता. मात्र ओबीसी आरक्षणाचा विचार करता राज्य सरकारने विधेयक सादर करून प्रभाग रचनेचे प्रारुप रद्द केले आहे. सर्व अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहे. यामुळे निवडणूक ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे. पुढील सहा महिने कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना जोडून ठेवणे दावेदारासाठी सोपे नाही. त्यामुळे आता दावेदार प्रभागात छोटे कार्यक्रम आयोजित करून लोकांत सक्रिय राहण्याच्या प्रयत्नात आहे. निवडणूक लांबली तरी योग्य दावेदार तोपर्यंत तग धरू शकतील. कंत्राटदार, बिल्डर, ले-आऊटचा व्यवसाय करणारे आपल्या व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र वरिष्ठ नेते व आमदारांकडे हजेरी लावून बॅनर, पोस्टर लावण्यात सक्रिय आहेत.
नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांकडेच
मनपात प्रशासकीय राजवट सुरू होताच पदाधिकारी, नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आले आहे. मात्र सामान्य नागरिकांवर याचा कोणताही फरक पडलेला नाही. प्रभागातील समस्यांसाठी माजी नगरसेवकाकडे जात आहेत. ज्येष्ठ नगरसेवक मनपा अधिकाऱ्यांना फोन करून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रशासनावर पकड नसलेले नगरसेवक हात वर करून जबाबदारी टाळत आहेत. याचा फटका निवडणुकीत बसणार आहे.
घराघरात संपर्काचा प्रयत्न
मनपा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता असली तरी काही योग्य दावेदार सक्रिय आहेत. नागरिकांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधत आहेत. कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. एप्रिल महिन्यात निवडणूक होईल. असे गृहीत धरून तयारीला लागलेले सध्या गप्प आहेत.