विमान प्रवासी वाढले, मार्चपासून उड्डाणेही वाढणार; विमान कंपन्या होणार सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 08:40 AM2022-02-08T08:40:00+5:302022-02-08T08:40:01+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून विमाने पूर्ण क्षमतेने उड्डाण करीत आहेत. त्यामुळे मार्चपासून उड्डाणे वाढण्याची शक्यता वाढली आहे.
वसीम कुरैशी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून विमाने पूर्ण क्षमतेने उड्डाण करीत आहेत. त्यामुळे मार्चपासून उड्डाणे वाढण्याची शक्यता वाढली आहे. १ जानेवारीपासून प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ असल्याचे दिसून येत आहे.
इंडिगो कंपनीचे लखनौ, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, इंदूर, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाताकरिता उड्डाणे होत आहेत. दररोज १२ ते १४ विमानांचे उड्डाण होत असून मार्चपर्यंत संख्या २० वर जाण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नई आणि गोवाचे उड्डाण बंद आहे. दोन्ही उड्डाण मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अन्य शहरे वगळता केवळ बंगळुरू विमानासाठी आरटीपीसीआर आणि दोन्ही लसीचे प्रमाणात अनिवार्य आहे. त्यामुळे या विमानात प्रवासी संख्या कमी आहे.
गो फर्स्टचे मुंबई विमान १५ पर्यंत रद्द
गो फर्स्टचे सध्या केवळ पुणेकरिता उड्डाण असून १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई विमान बंद ठेवले आहे. हे उड्डाण मार्चमध्ये सुरू होणार आहे. यापूर्वी एअर इंडियाने रात्रीचे मुंबई विमान बंद केले होते, पण जानेवारीत हे उड्डाण सुरू झाले आहे.
पाच वर्षांत चार एअरलाईन्स बंद
गेल्या पाच वर्षांत ट्रू जेट, जेट एअरवेज, एअर एशिया आणि कतार एअरलाईन्सने विमानसेवा बंद केली आहे. आता नागपूर विमानतळावरून केवळ इंडिगो, गो फर्स्ट व एअर इंडियाची उड्डाणे सुरू आहेत. रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत २०२१ मध्ये फ्लॉयबिग एअरलाईन्स सुरू होणार होती. ४ डिसेंबर २०२० ला चाचणी विमान सुरू केले होते. हैदराबाद, इंदूर, नागपूर, अहमदाबाद, भोपाल व रायपूरकरिता विमानाचे संचालन होणार होते, पण कोरोनामुळे त्यावर विराम लागला. गोवा आणि चेन्नई विमान बंद असून नागपुरातून भोपाळ, रायपूर व जयपूरकरिता थेट उड्डाण नाही. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर कंपन्यांच्या अनेक प्रयत्नानंतरही उड्डाणे सुरू होऊ शकली नाहीत.