आशा कार्यकर्त्यांचा कोविड-१९ च्या कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:27 AM2020-07-11T00:27:01+5:302020-07-11T00:28:50+5:30
आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सिटू) नागपूर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वात आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन पुकारत कोविड-१९ च्या कामांवर बहिष्कार घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सिटू) नागपूर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वात आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन पुकारत कोविड-१९ च्या कामांवर बहिष्कार घातला आहे.
आशा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ते गेल्या चार महिन्यांपासून कोविड सर्व्हेचे काम करीत आहेत. सर्वेसाठी २०० रुपये प्रति दिन देण्यात येणार होते. परंतु आता पैसे नसल्याचे कारण सांगून पैसे देण्यास असमर्थता दर्शविली जात आहे. मनपाच्या आरक्षित निधीमधून आशा कार्यकर्त्यांना ही रक्कम देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी शुक्रवारपासून आशा कार्यकर्त्यांनी कामावर बहिष्कार घालत आंदोलन सुरु केले आहे. संघटनेनुसार आशा कार्यकर्त्यांनी भूमिका ही फ्रंट लाईन वर्कर्सची असल्याची बाब कोविड-१९च्या संकटकाळात संपूर्ण देशाला माहिती झाली आहे. यानंतरही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आपापल्या हातात मागण्यांचे फलक घेऊन मूक आंदोलन केले. सुरक्षित अंतर राखून आंदोलन करण्यात आल्याचा दावाही संघटनेने केला आहे. कोविड-१९ सर्व्हेसाठी २०० रुपये प्रति दिन यानुसार रक्कम देण्यात यावी, एपीएल, बीपीएलची अट रद्द करून सर्वांना समान ३०० रुपये देण्यात यावेत, आशा वर्कर्ससोबत सन्मानपूर्वक व्यवहार करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
राजेंद्र साठे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, मनीषा वारस्कर, अंजू चोपडे, कल्पना हटवार, मंदा गंधारे, पौर्णिमा पाटील, रूपलता बोंबले, नंदा लिखार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या