थेट नागपूर मनपा सभागृहात घुसल्या आशा कार्यकर्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:02 PM2018-02-03T21:02:34+5:302018-02-03T21:07:14+5:30
महापालिका सभागृहात झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना अचानक आरोग्य विभागातील आशा कार्यकर्त्या पोलीस व सुरक्षा रक्षकांना न जुमानता सभागृहात घुसल्या. या गोंधळामुळे महापौर नंदा जिचकार यांना शनिवारी सर्वसाधारण सभेचे कामकाज स्थगित करावे लागले. काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी आशा कार्यक र्त्यांना सभागृहात घुसवल्याचा आरोप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका सभागृहात झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना अचानक आरोग्य विभागातील आशा कार्यकर्त्या पोलीस व सुरक्षा रक्षकांना न जुमानता सभागृहात घुसल्या. या गोंधळामुळे महापौर नंदा जिचकार यांना शनिवारी सर्वसाधारण सभेचे कामकाज स्थगित करावे लागले. काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी आशा कार्यक र्त्यांना सभागृहात घुसवल्याचा आरोप आहे.
सभागृहाबाहेर महापालिकेतील कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या बॅनरखाली आंदोलन करीत होते. मात्र शेळके यांनी आशा कार्यकर्त्यांना सभागृहात घुसण्याचा सल्ला दिला. त्यांना घेऊ न सभागृहाच्या गेटपुढे आले. तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा रक्षकांना न जुमानता आशा कार्यकर्त्यां बॅनर व झेंडे घेऊ न नारेबाजी करीत सभागृहात घुसल्या. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
नारेबाजी व गोंधळामुळे महापौरांना सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. कामकाज स्थगित झाल्यानतंर आशा कार्यकर्त्यांनी शेळके यांच्यामुळे आम्ही सभागृहात आलो. प्रशासन व पदाधिकाºयांनी आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भूमिका मांडली.
बंटी शेळके यांच्या या भूमिकेवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बोलण्याचे टाळले. हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले. सत्तापक्ष नेते संदीप जोशी, प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी यांच्यासह अन्य सदस्यांनी आंदोलक महिलांची समजूत काढली. कामकाज सुरू असताना सभागृहात घुसणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकरणात कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव करून दिली.
सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता
नगरसेवक बाहेरील लोकांना जबरीने सभागृहात घुसवून कामकाजात बाधा निर्माण करीत असल्यास त्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई होऊ शकते. यात निलंबन कारवाई होण्याची शक्यता असते. वारंवार अशा घटना घडण्याला एखादा नगरसेवक कारणीभूत असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असते.
दुर्दैवी घटना; नियमानुसार कारवाई होईल
प्रभागातील समस्या मार्गी लागाव्या यासाठी नागरिक नगरसेवकांना निवडून देतात. सभागृहात सदनशीर मार्गाने प्रश्न उपस्थित करून सोडविण्यात यावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते. आशा कार्यक र्त्यांना सभागृहात घुसवण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. हा प्रकार सर्वांनी आपल्या डोळ्यांनी बघितला. मात्र शेळके स्वत: सभागृहात आले नाही. या प्रकरणात नियमानुसार कारवाई केली जाईल.
- संदीप जोशी, सत्तापक्षनेते महापालिका