आशा, अंगणवाडी सेविकांचा गडकरींच्या कार्यालयावर मोर्चा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:56+5:302021-01-17T04:07:56+5:30
नागपूर : आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी आपल्या पूर्वनिर्धारित घोषणेनुसार शनिवारी आयटकच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यलयावर ...
नागपूर : आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी आपल्या पूर्वनिर्धारित घोषणेनुसार शनिवारी आयटकच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यलयावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी मोर्चा अडविल्यावर शिष्टमंडळाने गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली आणि मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.
आयटकच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा गडकरी यांच्या कार्यालयाकडे कूच करीत असताना पोलिसांनी त्यांना अडवून हनुमान मंदिराच्या प्रांगणात थांबण्याची सूचना केली. त्यानुसार तिथे थांबल्यावर आंदोलकांची गर्दी वाढतच गेले. दरम्यान, या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. गडकरी यांच्या कार्यलयावर जाऊन चर्चा करण्याची मागणी आंदोलकांची होती. याची दखल घेऊन गडकरी यानी शिष्टमंडळाला त्यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी पाचारण केले. आयटकचे राज्य महामंत्री श्याम काळे, काले, राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. युगल रायलू, वर्षा घिखले यांच्या शिष्टमंडळाने चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द केले. महिला प्रसूती रजाही मर्यादित केली. यासह अनेक मागण्यांवर चर्चा झाली. या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून सरकारसोबत चर्च करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, मोर्चाचे रूपांतर सभेत झाले असताना शेतकरी नेते अरुण वनकर, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे नेते चंद्रशेखर मोरया, उषा चारभे, जयश्री चहांदे, मंदा डोंगरे, ज्योती अंडरसहारे, मंगला पांडे, करुणा साखरे आदींनी मार्गदर्शन केले.