नागपुरात कोरोना सर्व्हे करणाऱ्या आशा वर्करला धमकाविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:10 AM2020-04-14T00:10:49+5:302020-04-14T00:11:48+5:30
उत्तर नागपुरातील कामगारनगर वस्तीत कोरोनाचा सर्व्हे करायला गेलेल्या आशा वर्करला अपमानित करून धमकाविण्यात आले आहे. यामुळे आशा वर्करमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपुरातील कामगारनगर वस्तीत कोरोनाचा सर्व्हे करायला गेलेल्या आशा वर्करला अपमानित करून धमकाविण्यात आले आहे. यामुळे आशा वर्करमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी आशा वर्करची तक्रार दाखल केली आहे. पण या प्रकरणी कुठलीही कारवाई झालेली नाही.
पीडित आशा वर्कर आपल्या तीन महिला सहकाऱ्यांसोबत रविवारी दुपारी ११.३० वाजता कामगारनगर वस्तीत सर्व्हे करण्यास गेली होती. आशा वर्कर वस्तीत राहणाºया गुलाम हमीद यांच्या घरी गेली. घरात त्यांची पत्नी बसली होती. आशा वर्करने गुलामच्या पत्नीला कुटुंबाची माहिती मागितली. तिच्याकडून गुलामचा मोबाईल नंबर विचारला. मोबाईल नंबर सांगत असतानाच, गुलाम ओरडत आला. तो त्याच्या पत्नीवरच मोबाईल नंबर का दिला म्हणून ओरडू लागला. त्याने आशा वर्करला खरे-खोटे ऐकवत आयकार्ड दाखविण्याची मागणी केली. आशा वर्करने सर्व्हे करण्यास टीम आल्याचे सांगितले. त्या सर्व टीमला बोलवा, असे तो म्हणाला. टीमच्या सहकाऱ्यांना आशा वर्कर शोधू लागली. तेव्हा गुलाम संतप्त होऊन ओरडत ओरडत आशा वर्करजवळ आला. त्याने आशा वर्करजवळ असलेली कागदपत्र फेकले, आयकार्ड फेकून दिले. गुलाम हल्ला करेल या भीतीने आशा वर्कर तिथून निघून गेल्या.