भाऊबीज निधीसाठी आशांनी घातली मंत्र्यांना ओवाळणी; सरकार विरोधात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 04:42 PM2022-10-26T16:42:34+5:302022-10-27T15:09:52+5:30
संविधान चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी
नागपूर : आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांनी सरकारकडे भाऊबीज निधीची मागणी केली होती. परंतु सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने भाऊबीजेला संविधान चौकात आशांनी मंत्र्यांच्या फोटोंना ओवाळणी घालून, सरकारचा निषेध केला.
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) नागपूर जिल्हा कमिटीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी ओवाळणी घातली.
आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना १० हजार रुपये भाऊबीज निधी द्यावा. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. किमान वेतन द्यावे, कुटुंबास आरोग्य विमा लागू करावा, सन्मानजनक वागणूक द्यावी, ६ महिन्याची पगारी प्रसूती रजा द्यावी आदी मागण्यांसाठी आशांनी धरणे आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे यांनी केले.