आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 06:50 PM2023-06-27T18:50:44+5:302023-06-27T18:57:51+5:30

Yawatmal News आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल.

Ashadhi will not be sacrificed; Decision of Muslim brothers of Yavatmal district | आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

googlenewsNext

विलास गावंडे 

यवतमाळ : आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव व दारव्हा तालुक्यातील नऊ गावांमधील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. शांतता समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. संबंधित गावातील मशीद कमिटी आणि मौलवींनी पोलिस ठाण्याला तसे निवेदनही दिले आहे. बाभूळगाव येथील पोलिस ठाण्याच्या प्रांगणात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शांतता समितीच्या सभेत ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

संवेदनशील तालुका अशी दारव्हाची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रामगाव रामेश्वर, हरू, तरनोळी, जवळा, सिंधी, पळशी, तरोडा, पेकर्डा, लोणी या गावांमध्ये ईदनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. तेथील मुस्लीम समाजबांधव आणि नागरिकांसोबत चर्चा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त २९ जून रोजी केवळ नमाज पठन केला जाईल. कुर्बानी ईदच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसे निवेदनही पोलिस ठाण्याला दिले.


बाभूळगाव येथे सभेप्रसंगी मंचावर ठाणेदार रवींद्र जेधे, नगराध्यक्ष संगीता मालखुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशचंद छाजेड, नगरसेवक शेख कादर, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली, माजी सरपंच भारत इंगोले, जिल्हा सेवाधिकारी पद्माकर ठाकरे, मौलाना मोहम्मद शफाकत, मौलाना सलाउद्दीन, मौलाना अली हसन आदी विराजमान होते. गुरुवारी (दि. २९) आषाढी एकादशीला हिंदू बांधव उपवास ठेवतात. याच दिवशी बकरी ईद आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी जामा मशीदमध्ये बैठक घेऊन गुरुवारी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला. शांतता समितीच्या सभेत जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष आरिफ अली यांनी ही माहिती दिली.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. उपवासाचे महत्त्व ओळखून मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
बाभूळगाव तालुका जातीय आणि धार्मिक सलोख्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ओळखला जातो. मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय जिल्ह्यासाठीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शांतता राखण्याकरिता मोठी बाब आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. संचालन व आभार पोलिस उपनिरीक्षक मंगेश डांगे यांनी मानले.

सभेला नगरपंचायतचे उपाध्यक्ष श्याम जगताप, नगरसेवक सुरेश वर्मा, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजानन पांडे (ठाकरे गट), भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रवीण तातेड, रमेशचंद तातेड, नगरसेवक अनिकेत पोहोकार, माजी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, अमर शिरसाट, पत्रकार शहजाद भाई, जाकीर खान, अंकुश सोयाम, नईम खान, शब्बीर खान, प्रदीप नांदुरकर, मुस्तफाखाँ, नियाज अहमद, शेख जब्बार, मोहम्मद जावेद, जावेद खान मनवर खान, अक्षय राऊत, सरफराज खान आदी उपस्थित होते.

Web Title: Ashadhi will not be sacrificed; Decision of Muslim brothers of Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.