Nagpur | कन्हान नदीत पुन्हा वीज केंद्राची राख, पाणीपुरवठा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 12:48 PM2022-07-11T12:48:38+5:302022-07-11T12:54:56+5:30
येणारे दोन दिवस पूर्व व उत्तर नागपुरातील पाण्याच्या टाकीत मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. रविवारी सकाळपासून काही भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
नागपूर : संततधार पावसामुळे कन्हान नदीला पूर आला आहे. रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास वीज केंद्राची राख नदीच्या इनटेक वेलपासून वाहताना दिसून आली. त्यामुळे तत्काळ इनटेक वेल बंद करण्यात आली. त्यामुळे नदीतून पाणी जलशुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या पाण्याचा पुरवठा ठप्प झाला आहे. येणारे दोन दिवस पूर्व व उत्तर नागपुरातील बहुतांश भागांत पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
कन्हान नदीतून पाच इनटेक वेलच्या माध्यमातून दररोज २१० ते २२० एमएलडी पाणी पंपिंग करून जलशुद्धीकर केंद्रात सोडण्यात येते. तेथून भूमिगत जलवाहिनीच्या माध्यमातून उत्तर व पूर्व नागपुरातील २८ पाणी टाक्यांना पुरवठा होतो. कन्हान नदीच्या पाण्याला कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करण्यात येते; परंतु राखेला स्वच्छ करणे शक्य नसल्याने कन्हान नदीतील इनटेक वेलला बंद करण्यात आले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ७.३० वाजता नदीपात्रातून राख पूर्णत: निघून गेल्यानंतर तीन पंपांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया सुरू झाली. जर इनटेक वेल ठप्प पडले, तर जलशुद्धीकरण केंद्र बंद होते व स्थिती सामान्य होण्यासाठी बरेच तास लागू शकतात. त्यामुळे येणारे दोन दिवस पूर्व व उत्तर नागपुरातील पाण्याच्या टाकीत मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. रविवारी सकाळपासून काही भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
- राखेच्या तलावातून गळतीची शक्यता
वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेला तलाव (फ्लाय ॲश पॉण्ड)मध्ये ठेवले जाते. कन्हान परिसरात शनिवारपासून पाऊस संततधार सुरू आहे. त्यामुळे तलावातून राखेची गळती झाल्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील पावसाळ्यात कन्हान नदीपात्रात राख पसरली होती.
- राखमिश्रित पाण्याला शुद्ध करणे अशक्य
जलशुद्धीकरण केंद्रात ९ हजार एमटीयू अर्थात गाळमिश्रित पाणी शुद्ध केले जाऊ शकते; परंतु राखमिश्रित पाण्याला शुद्ध करणे अशक्य आहे. ते पाणी विषारी असते. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ वॉटर पंपाला पूर्णत: स्वच्छ केले जाते. कारण त्यात कुठलीही राख शिल्लक राहू नये.