नागपूरच्या आशिष दर्पे यांना जगातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांमध्ये स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:05 AM2020-11-27T04:05:16+5:302020-11-27T04:05:16+5:30
उदय अंधारे नागपूर : नागपूरचे सुपुत्र आशिष कमलाकर दर्पे यांनी जगातील सर्वोत्कृष्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळवले आहे. ते ...
उदय अंधारे
नागपूर : नागपूरचे सुपुत्र आशिष कमलाकर दर्पे यांनी जगातील सर्वोत्कृष्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळवले आहे. ते आयआयटी नवी दिल्ली येथे प्राध्यापक आहेत. त्यांच्यामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अमेरिका येथील स्टॅन्फोर्ड विद्यापीठाने यासंदर्भात सर्वेक्षण केले. त्या आधारावर दर्पे यांना सर्वोत्कृष्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग शास्त्रज्ञांमध्ये जागतिकस्तरावर ६४२ वे तर, भारतस्तरावर ७ वे स्थान देण्यात आले. या सर्वेक्षणात गेल्या २५ वर्षांतील संशोधन विचारात घेण्यात आले. दर्पे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये गेल्या २० वर्षांत विविध प्रकारचे उपयोगी संशोधन केले. त्याचा लाभ उद्योगांना मिळत आहे. दर्पे यांच्याशी जुळलेली संशोधकांची चमू एल ॲण्ड टी कंपनीत कार्य करीत आहे. ती चमू युद्धात वापरण्यात येणाऱ्या तोफांसाठी महत्त्वाचे संशोधन करीत आहे. रेल्वे संचलन आणि हेलिकॉप्टर व विमानांच्या प्रणालीवर लक्ष ठेवणारे संशोधनही त्यांनी केले आहे. सध्या दर्पे व त्यांचे सहकारी इस्रोसोबत मिळून आर ॲण्ड डी प्रकल्पावर काम करीत आहेत. असाच प्रकल्प त्यांनी डीआरडीएलसोबत मिळून पूर्ण केला आहे. त्यांचे संशोधन औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या विकासाकरिता उपयोगी सिद्ध होत आहे.
---------------------
आदर्श जीवनामध्ये देवाचे अस्तित्व
मानवता, बुद्धिमत्ता व ज्ञानाच्या शक्तीवर विश्वास असणारे आशिष दर्पे यांनी आदर्श जीवनामध्ये देवाचे अस्तित्व असते, असे लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच, त्यांनी आयआयटी नवी दिल्लीला यशाचे श्रेय दिले. त्यांनी व्हीएनआयटी नागपूर येथून १९९६ मध्ये एम. टेक. (डिझाईन ऑफ मशीन्स ॲण्ड मेकॅनिजम) पदवी मिळवली. त्यानंतर २००२ मध्ये रोटर डायनामिक्समध्ये पीएच. डी. प्राप्त केली. त्यांचे आतापर्यंत १०० रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी ५३ पेपर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी प्रकाशित केले. त्यांनी ५७ संशोधन लेख व १० पीएच. डी. विद्यार्थ्यांचे परीक्षण केले. सध्या ९ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. संशोधन पूर्ण करीत आहेत.