आशिष जैस्वाल शिवसेनेवर नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:34+5:302021-07-15T04:06:34+5:30
नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून ...
नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून आलेल्यांना मंत्रीपदाची संधी मिळते. कार्यकर्त्यांना वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर मंत्री करायला हवे. शेवटी कुणाला मंत्री करावे, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, अशा शब्दांत जैस्वाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना आ. जैस्वाल म्हणाले, मी चार टर्म आमदार आहे. पक्षाने संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होता तेव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो मी मान्य करेन, असे स्पष्ट केले होते. मात्र, ही बाब सत्य आहे की, कार्यकर्त्यांना असे वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर संधी मिळायला हवी. विदर्भात शिवसेना वाढली पाहिजे; पण नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत पक्षाचा एकही आमदार नाही. मी तर अपक्ष निवडून आलो. या सर्व परिस्थितीत मनाला वेदना होतात. दुख होते. ते दु:ख नेत्यांपुढे मांडणे माझे काम आहे. संधी मिळते तेव्हा मी ते मांडत असतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.
----------
विदर्भात सेनेचा एकही मंत्री नाही
- विदर्भाला संजय राठोड यांच्या रूपात एक मंत्रीपद होते. दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला. आता विदर्भातील अकरा जिल्ह्यांत शिवसेनेचा एकही मंत्री नाही. जेव्हा केव्हा विस्तार होईल, तेव्हा पक्षप्रमुख विदर्भाला न्याय देतील. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देतील, अशी खात्री आहे, असेही सांगत जैस्वाल यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.
--------
कोट....
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. अनेक अपक्षांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद दिले गेले. त्यामुळे माझ्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अनेकांना पक्ष न्याय देऊ शकला नाही.
-आ. आशिष जैस्वाल