डीबीटीतील खरेदीवरून आशिष जयस्वाल यांचा आत्मा कार्यालयात रुद्रावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:01+5:302021-08-27T04:13:01+5:30
नागपूर : आत्मा प्रकल्पातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्यामध्ये प्रचंड गैरप्रकार आणि सौद्यातून कमिशनबाजी होत असल्याचा आरोप करीत आमदार ...
नागपूर : आत्मा प्रकल्पातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्यामध्ये प्रचंड गैरप्रकार आणि सौद्यातून कमिशनबाजी होत असल्याचा आरोप करीत आमदार आशिष जयस्वाल यांनी कार्यालयात जाऊन प्रचंड संताप व्यक्त केला आणि कार्यालय डोक्यावर घेतले.
आत्मा प्रकल्प कार्यालयातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून साहित्याचा पुरवठा होतो. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा खरेदी हक्क डावलून त्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचा माल मारला जात असून, बाजारभावापेक्षा अधिक किंमत लावली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार जयस्वाल यांच्याकडे केली होती. आठवडाभरापूर्वी काही शेतकरी यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आत्मा कार्यालयात प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गेले होते. मात्र त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी ही बाब जयस्वाल यांच्या कानावर घातली. यामुळे दोन दिवसापूर्वी त्यांनी कार्यालयात जाऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि प्रचंड संताप व्यक्त केला.
यासंदर्भात ‘लोकमत’कडे प्रतिक्रया देताना आमदार जयस्वाल म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागणारी यंत्रसामग्री व विविध वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी जिल्हा खनिज विकास निधीतून हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार डीबीटी पद्धतीने ही सर्व यंत्रसामग्री खरेदी करणे आवश्यक होते. मात्र प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या कार्यालयाने वेगवेगळ्या कंपनीशी परस्पर पत्रव्यवहार करून कमी किमतीच्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदी केली व ते अधिक दराने शेतकऱ्यांच्या माथी मारले. यात प्रचंड कमिशनबाजी आणि भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकल्प कार्यालयाने स्वतःच ऑर्डर टाईप करून त्यामध्ये कंपनीचे नाव टाकले होते. शेतकरी गटातील अध्यक्ष व सचिव यांची बळजबरीने स्वाक्षरी घेत होते. शेतकऱ्यांना माल खरेदी करण्याचा अधिकार नसल्याची दिशाभूल कार्यालयाकडून करण्यात आल्याची शेतकऱ्यांची तक्रार आपल्याकडे असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
यासंदर्भात आत्माच्या प्रकल्प अधिकारी नलिनी भोयर यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र होऊ शकला नाही.
...
कोट
शेतकऱ्यांनी आपल्या आवडीनुसार दुकानांमधून माल खरेदी करण्याची मुभा डीबीटी प्रक्रियेत असताना, आत्मा प्रकल्प अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. निकृष्ट दर्जाचा माल पाठविला. यात कमिशनबाजी आणि भ्रष्टाचार असल्याने आपण कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलो होतो. यासंदर्भात कृषिमंत्र्यांकडेही तक्रार करणार आहे.
- आशिष जयस्वाल, आमदार
...
...