अर्थसंकल्पाची ऐशीतैशी; बुलेट ट्रेनसाठी २५० कोटी, हेलिकॉप्टरसाठी १५९ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:10 AM2018-07-05T06:10:58+5:302018-07-05T06:10:58+5:30
अर्थसंकल्प मांडल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ११ हजार ४४५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्याची नामुश्की फडणवीस सरकारवर ओढवली आहे.
नागपूर : अर्थसंकल्प मांडल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ११ हजार ४४५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्याची नामुश्की फडणवीस सरकारवर ओढवली आहे. अर्थसंकल्प मांडताना एवढे नवे खर्च सरकारला कसे दिसले नाही आणि दिसले असल्यास सरकारने त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद का केली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
ज्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिवसेना व मनसेने विरोध केला आहे, त्यासाठी राज्याचा हिस्सा देण्यासाठी २५० कोटी रुपयांचा पुरवणी मागण्यांत तरतूद केल्याने शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या निर्णयानुसार एक हेलिकॉप्टर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात २०१२ साली सरकारने विकत घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते हेलिकॉप्टर वापरत. त्यास अपघात झाला. त्यामुळे सरकार १५९ कोटी रुपये खचून आणखी दोन हेलिकॉप्टर खरेदी करीत आहे. ही खरेदी कुणासाठी आहे, याचा तपशील दिलेला नाही.
मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव तरतूद
नागपूर मेट्रोसाठी १०० कोटी तर पुणे मेट्रोसाठी ३१२ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचे सरकारने ठरवल्याने त्यासाठी ४१२ कोटी रुपये अतिरिक्त तरतूद केली आहे.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठीही ११७ कोटी रुपयांची सरकारने मागणी केली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांसह पुणे व नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य शासनाच्या दुय्यम कर्जासाठी १३० कोटी अतिरिक्त तरतूद करण्याचे ठरवले आहे.