नागपुरातील नवोदय बँक घोटाळा : अशोक धवड यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:00 AM2019-11-06T00:00:23+5:302019-11-06T00:02:36+5:30
पदाचा दुरुपयोग करून नवोदय बँकेत घोटाळा घडवून आणणारे बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक धवड यांना अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने मंगळवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे कारागृहातून अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदाचा दुरुपयोग करून नवोदय बँकेत घोटाळा घडवून आणणारे बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक धवड यांना अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने मंगळवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे कारागृहातून अटक केली.
नागपुरातील सुस्थितीतील बँक म्हणून १० वर्षांपूर्वी नवोदय बँक नावारूपाला होती. बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ठगबाजांना पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिले. त्यांना लाखोंचे कर्ज देताना तारण म्हणून जी मालमत्ता ठेवली, त्याची शहानिशाही करण्यात आली नव्हती. काही कर्जदारांकडे आधीच थकबाकी होती, अशा डिफॉल्टर कर्जदारांनाही धवड आणि त्यांच्या साथीदारांनी पुन्हा लाखोंचे कर्ज दिले. ठगबाजांना कर्ज वाटणाऱ्या या टोळक्यात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही सहभागी होते. त्यांनी स्वत:साठीही लाखोंचे कर्ज घेतले आणि दुसरेच कर्जाची परतफेड करीत नसेल तर आपण कशाला फेडायचे, असे स्वत:च स्वत:ला सांगत सुस्थितीतील नवोदय बँकेला पुरते डबघाईला आणले. या बँकेत आपल्या आयुष्याची कमाई ठेवीच्या रूपात ठेवणाºया गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळेनाशी झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात तक्रारी, ओरड झाली आणि नंतर सहकार खात्यातर्फे बँकेच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली. त्यामुळे नवोदय बँकेचा घोटाळा उजेडात आला. या पार्श्वभूमीवर, १५ मे २०१९ रोजी धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बँकेला बुडविणारे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह अन्य आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने आरोपींची धरपकड सुरू केली. धवड यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. जामीन मिळण्याची शक्यता संपल्याने आणि न्यायालयाकडून दिलेली मुदत संपल्याने अखेर सोमवारी धवड न्यायालयाला शरण गेले. त्यांची न्यायालयीन कस्टडीत रवानगी करण्यात आली. मंगळवारी त्यांना प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले.
धवड चौदावे आरोपी
आतापर्यंत पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. त्यात कुख्यात, ठगबाज बिल्डर हेमंत झाम, मुकेश झामचाही समावेश आहे. धवड यांच्या अटकेमुळे हा आकडा आता १४ वर पोहचला आहे. बुधवारी न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी मिळवली जाणार आहे.