मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान

By नरेश डोंगरे | Published: December 2, 2024 08:43 PM2024-12-02T20:43:21+5:302024-12-02T20:44:27+5:30

उपराजधानीच्या कानाकोपऱ्यात पायपीट

Ashrappa Bendre searching for a psychotic brother but his headache increases Nagpur News | मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान

मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काही क्षणांसाठी स्वत:कडून झालेले दुर्लक्ष त्याच्या मनावर अपराधीपणाचे भलेमोठे ओझे ठेवून गेले. त्यात पोलिसांची बेपर्वाईदेखिल त्याला नडली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पायाला भिंगरी लावल्यागत तो स्वत:ला विसरून त्याच्या हरविलेल्या भावाला शोधत आहे. त्याची अवस्था मन हेलावणारी आहे. मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता तोच वेडा होतो की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

आश्रप्पा बेंद्रे असे या व्यक्तीचे नाव असून, ते बुलडाणा जिल्ह्यातील वडव (लोणार) येथील रहिवासी आहेत. बेंद्रे यांचा लहान भाऊ ओंकार हा मनोरुग्ण आहे. अनेक वर्षे खासगीत उपचार केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी त्याला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ओंकारवर नागपुरात उपचार सुरू होते. त्याला घरी घेऊन जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्यामुळे आश्रप्पा नागपुरात आले.  २९ ऑक्टोबरला मनोरुग्णालयातून सुटी मिळाल्यामुळे दुपारी १ वाजता भावावर मुलागत प्रेम करणारे आश्रप्पा ओंकारला घेऊन बुलडाण्याला जाण्याच्या तयारीत होते.

दिवाळीचा सण आपल्या भावासोबत गावातच साजरा करता येणार, या कल्पनेने ते हुरळले होते. सीताबर्डीत ऑटोतून उतरल्यानंतर भावाचा हात धरून ते पोलिस ठाण्यासमोरून जात होते. यावेळी दिवाळीच्या खरेदीसाठी बर्डीत प्रचंड गर्दी उसळली होती. काही क्षणासाठी आश्रप्पाच्या हातून ओंकारचा हात सुटला अन् घात झाला. ओंकार दिसेनासा झाला. वेडेपिसे झाल्यागत आश्रप्पा ओंकारला शोधू लागले. लगेच त्यांनी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. आपला मनोरुग्ण भाऊ हरवला आहे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून तो कुठे गेला, ते दिसू शकेल, असे म्हणत पोलिसांना मदतीची गळ घालू लागले.

पोलिसांनी निर्विकारपणे बराच टाइमपास केला. काही वेळेनंतर पुलाजवळ दिसतो मात्र, मोरभवन जवळच्या सीसीटीव्हीत गर्दीमुळे काहीच लक्षात येत नसल्याचे सांगून त्यांनी आश्रप्पाची बोळवण केली. ते पुन्हा रडत कुढत भावाचा शोध घेऊ लागले. ५ नोव्हेंबरला त्यांनी डीसीपी राहुल मदनेंना तक्रारअर्ज दिला. आश्रप्पा यांच्या माहितीनुसार, डीसीपी मदनेंनी लगेच सीताबर्डी पोलिसांना आदेश दिले. त्यानंतर १२ नोव्हेंबरला पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. यावेळी बेपत्ता झालेला ओंकार मोरभवन, लोकमत चाैक ते रहाटे कॉलनी या भागात २९ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजेपर्यंत फिरताना दिसला. नंतर मात्र तो कुठे गेला, ते काही दिसून आले नाही. तेव्हापासून आश्रप्पा आपल्या भावाला शोधण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान करीत आहेत. एकाच कपड्यावर सकाळपासून रात्रीपर्यंत फिरायचे आणि नंतर निराधारांच्या निवाऱ्यात जाऊन झोपायचे, असा त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यांचे अलीकडेच हर्नियाचे ऑपरेशन झाले आहे.

महिनाभरापासूनच्या या दिनचर्येने त्यांची शारीरिक स्थिती बिघडली आहे. त्यांची केसभूषा, वेषभूषा अतिशय वाईट झाली आहे. कुणी आस्थेने विचारपूस केल्यास ते आपल्या भावना अश्रूच्या रूपाने व्यक्त करतात. त्यांची कैफियत ऐकून त्यांच्याच मानसिक स्थितीवर परिणाम होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

पोलिसांची दोन रूपं

मनोरुग्णाच्या बेपत्ता प्रकरणात पोलिसांची बेपर्वाई अधोेरेखित होते. पोलिसांनी तत्परता दाखवून लगेच सीसीटीव्ही तपासले असते तर आपला भाऊ आपल्यासोबत असता. त्यांच्या बेजबाबदारपणामुळेच ही वेळ आल्याचे शून्यात हरविलेले आश्रप्पा म्हणतात. विशेष म्हणजे, बेपत्ता ओंकारचा शोध घेण्यासाठी आता आठवडाभरापासून पोलिस हवलदार मोहन कनोजिया रात्रंदिवस मदत करीत आहेत, असेही ते सांगतात. पोलिसांचेच हे दोन रूपं आश्रप्पांच्या मनोवेदना तीव्र करणारे आहेत.

तो कसा असेल?

आश्रप्पाची अवस्था फारच दयनीय आहे. अशातही ते म्हणतात, ‘माझे ठीक आहे, मळकटले का होईना अंगावर कपडे आहेत, खायला अन्न मिळते अन् पांघरण्याचीही सोय आहे. त्याला काही मागून घेता येत नाही. मदतीशिवाय खाता-पिता येत नाही. सध्या कडाक्याच्या थंडीचे दिवस आहेत. कुठे झोपत असेल, कसा राहत असेल,’ असे प्रश्न करून आश्रप्पा आतून शहारल्यासारखे होतात.

Web Title: Ashrappa Bendre searching for a psychotic brother but his headache increases Nagpur News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर