अश्वघोषाने भारतीय विचार मांडला, फुटीरतावाद्यांनी त्याला वेगळ्या गटात नेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2022 09:44 PM2022-10-07T21:44:17+5:302022-10-07T21:44:41+5:30
Nagpur News शास्त्रांतील तटस्थ विचारांचा आधार घेत फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावून त्याला वेगळ्या गटात नेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे दिली.
नागपूर : सामाजिक भेदभाव मानणाऱ्यांच्या विरुद्ध बोलणारे सारेच आदर्श चरित्र आहेत. अश्वघोषाने ‘वज्रसूची उपनिषद’मध्ये याच भेदांचा विरोध करणारे सारे आकलन व संदर्भ प्राचीन भारतीय सनातन वैदिक ग्रंथाच्या आधारेच मांडले आहे. परंतु, त्याच शास्त्रांतील तटस्थ विचारांचा आधार घेत फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावून त्याला वेगळ्या गटात नेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे दिली.
शुक्रवारी विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे संशोधित ‘वज्रसूची टंक’ या ग्रंथाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते मंडळाच्या डॉ. वा. वि. मिराशी सभागृहात करण्यात आले. व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, मंडळाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे उपस्थित होते.
जगभरातील सर्वच समाजात पूर्वजांनी चुका केल्या आहेत. याचा अर्थ ते सारेच कुटिल होते असे नाही. आपल्या देशातही हेच झाले. शास्त्र (कायदा) आणि मनुष्य, यात मनुष्य श्रेष्ठ आहे. परंतु, सामाजिक संतुलनासाठी कायदा पाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कर्तव्यरूपी धर्म पाळणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच धर्म सर्वश्रेष्ठ मानला जातो. संतुलित व्यवहार शिकविण्यासाठीचे कर्तव्य म्हणजेच धर्म होय. महाभारत, रामायण, उपनिषदे आदी भारतीय शास्त्रांमध्ये अतिशय तटस्थतेने प्रत्येक विचार प्रस्थापित करण्यात आला आहे. त्यात नायक आणि खलनायकाचे विचारही तटस्थ विचार प्रक्षेपित झाले आहेत. परंतु, खलनायकाच्या विचारांवर जोर देऊन इंग्रज व अन्य फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावली आणि हेच भारतीय विचार असल्याचे बिंबविले आणि त्यात साराच समाज भ्रमिष्ट झाल्याने वाणीविवेक व कृतिविवेकाने पुढे जाणे गरजेचे असल्याचे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव हळदे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले.
...........................