एटीएममध्ये मदत मागणे महागात पडले
By admin | Published: May 17, 2017 03:22 PM2017-05-17T15:22:34+5:302017-05-17T15:25:05+5:30
एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका तरूणीला मदत मागणे महागात पडले. अनोळखी इसमाने याचा फायदा घेत तरूणीकडून एटीएम कॉर्ड, पासवर्ड घेवून दुसऱ्या एटीएममधून ४० हजार काढले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका तरूणीला मदत मागणे महागात पडले. अनोळखी इसमाने याचा फायदा घेत तरूणीकडून एटीएम कॉर्ड, पासवर्ड घेवून दुसऱ्या एटीएममधून ४० हजार काढले. ही घटना काल मंगळवारी साकोली येथे घडली. या प्रकरणी प्रगती नानाजी कांबळे, या तरुणीने साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुरमाडी (बारव्हा) येथील रहिवासी असलेल्या प्रगती कांबळे ही २० वर्षीय तरुणी साकोली येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मध्ये रक्कम काढण्यासाठी दुपारी १२.३० च्या सुमारास गेली होती. एटीएममधून रक्कम निघत नसल्याने तिने बाजूला उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाला मदत मागितली. सदर इसमाने तरुणीकडून एटीएम कार्ड व पासवर्ड मागितला. तसेच तरुणीचा एटीएम स्वत:जवळ घेऊन आपल्याजवळील एटीएम तरुणीला दिला. तसेच भंडारा येथील एका एटीएममधून कार्ड व पासवर्डचा वापर करून तरुणीच्या खात्यातून ४० हजार रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रगतीने साकोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध भादंविच्या ४२०, सहकलम ६६ सीआयटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्मा करीत आहेत.