वय कमी सांगून मागताहेत झाडे ताेडण्याची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 04:30 PM2021-12-05T16:30:13+5:302021-12-05T16:38:14+5:30
उद्यान विभागाने परवानगी देण्यापूर्वी याबाबत सूचना प्रकाशित करून आक्षेप मागविले हाेते. यावर सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप नाेंदवित विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या झाडांना कापण्यात येत आहे त्यांची नावे आणि वय का लपविले जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
फहीम खान
नागपूर : शहरात विकासाच्या नावावर झाडे कापण्याचे सत्र सर्रासपणे सुरू आहे. नुकतेच महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड नागपुरने (एमआरआयडीसीएल) शहरातील दाेन ठिकाणी ३६ झाडे कापण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली हाेती. त्यानुसार मनपाच्या उद्यान विभागाने जाहिरात प्रकाशित करून माहिती सार्वजनिक केली. मात्र, काेणती झाडे कापणार, त्यांचे वय किती याबाबत गुप्तता पाळली. यावर आक्षेप नाेंदविल्यानंतर मनपाने दुसऱ्यांदा जाहिरात प्रकाशित केली. यात त्यांनी झाडांचे नाव व त्यांच्या वयाचा उल्लेख केला पण यावेळीही त्यांच्या वयावरून गदाराेळ हाेत आहे. काही झाडांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी दर्शवून त्यांना कापण्याची परवानगी मागण्यात येत असल्याचा आराेप केला जात आहे.
शहरात कडबी चाैक ते पेहलवान शाहबाबा दरगाहदरम्यान हाेणारा उड्डाणपूल आणि पिलरच्या बांधकामात अडचण ठरणारी २४ तसेच पेहलवान शाहबाबा दरगाह रेल्वे पूल ते रामझुला राेड रेल्वे इन्स्टिट्यूटपर्यंत हाेणाऱ्या उड्डाणपूल व पिलरच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या १२ अशा एकूण ३६ झाडांना कापावे लागत आहे. यासाठी एमआरआयडीसीएलचे सीपीएम डाॅ. विकास दत्ता यांनी उद्यान विभागाकडे झाडे कापण्यासाठी परवानगी मागितली आहे.
उद्यान विभागाने परवानगी देण्यापूर्वी याबाबत सूचना प्रकाशित करून आक्षेप मागविले हाेते. यावर सामाजिक कार्यकर्ता सचिन खाेब्रागडे यांनी आक्षेप नाेंदवित विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या झाडांना कापण्यात येत आहे त्यांची नावे आणि वय का लपविले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर विभागाने नव्याने सूचना प्रकाशित करून झाडांची नावे आणि वयाचा उल्लेख केला आहे. मात्र खाेब्रागडे यांनी त्यावरही आक्षेप घेतला आहे. झाडांचे वय जाणूनच ४९ किंवा त्यापेक्षा कमी दाखविले जात असल्याचा आराेप त्यांनी केला आहे.
वय का लपविले जात आहे?
उल्लेखनीय म्हणजे ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या झाडांना कापण्याची परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला नाही. यासाठी महापालिकेला राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवावा लागताे. याच कारणाने कापण्यात येणाऱ्या झाडांचे वय ५० पेक्षा कमी दाखविण्यात येत असल्याचा आराेप सामाजिक कार्यकर्ता खाेब्रागडे यांनी केला.