दारूचं का विचारता, मोहफुलांचे आहेत असंख्य फायदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:07 AM2021-05-11T04:07:45+5:302021-05-11T04:07:45+5:30
नागपूर : मोहफुल म्हटले की त्यापासून तयार होणारी गावठी दारू हे समीकरण जणू गृहितच धरले गेले. या गृहितकामुळेच त्याच्या ...
नागपूर : मोहफुल म्हटले की त्यापासून तयार होणारी गावठी दारू हे समीकरण जणू गृहितच धरले गेले. या गृहितकामुळेच त्याच्या असंख्य पौष्टिक फायद्याकडे दुर्लक्ष करून गेल्या कित्येक वर्षांपासून मोहफुलांवर बंदी घातली गेली. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या आदिवासींना आर्थिक लाभ देणारे हे साधन हिरावले. आता मोहफुलांवरील बंदी उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आदिवासींना सीझनमध्ये आर्थिक फायदा मिळेल. सोबतच पर्यावरणपूरक प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.
मोहफुलांवरील बंदी उठविण्यासाठी नागपूरचे डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या नेतृत्वात २०-२५ वर्षांपासून लढा चालविला होता. त्यांच्या निधनानंतर का होईना या लढ्याला यश आल्याची भावना गडचिरोलीत कार्य करणारे डॉ. सतीश गोगुलवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, दारू केवळ मोहापासून बनते असे नाही. द्राक्षे, ऊस, संत्री याशिवाय तांदूळ, गव्हापासूनही दारू तयार केली जाते. मात्र यावर बंदी घातली गेली नाही. पण मोहफुलांवर बंदी घालणे अनाकलनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या रिपोर्टनुसार मोहफुलांमध्ये द्राक्षांपेक्षा अधिक न्यूट्रिशन असते, शिवाय व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियमसाठीही मोहाचे महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे द्राक्षे किंवा संत्र्यांवर कीटनाशकांचा मारा असतो. पण मोह म्हणजे कोणतीही फवारणी न करता तयार झालेले शुद्ध नैसर्गिक खाद्य होय. मात्र केवळ दारूशी संबंध जोडून आदिवासी समाजाच्या शुद्ध खाद्याला दूर ठेवण्यात आल्याची खंत डॉ. गोगुलवार यांनी व्यक्त केली. काेराेना काळात राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी माेहफुलांचे महत्त्व समजले आहे.
एक कुटुंब गाेळा करते एक-दीड टन माेह डाॅ़ गाेगुलवार यांनी सांगितले, गडचिराली भागात सीझनच्या वेळी बहुतेक कुटुंब माेहफुले गाेळा करतात. एक कुटुंब या १०-१२ दिवसाच्या काळात एक ते दीड टन माेहफुल गाेळा करतात. हे माेहफुल ४०-४५ रुपये दराने विकले जातात. म्हणजे सीझनमध्ये त्यांना २०-२५ हजाराचा धनलाभ हाेताे. मात्र खरेदी करणारे भीती दाखवून कमी दरात खरेदी करतात. बंदी उठविल्याने त्यांना कायदेशीरपणे ते विकता येईल. डाॅ. गाेगुलवार यांच्या पुढाकारातून काेरची भागात गावकऱ्यांना माेहफुल गाेळा करण्यासाठी प्रेरित केले. वनहक्क प्राप्त ग्रामसभा व वनधन विक्री केंद्राच्या माध्यमातून ते खरेदी करण्यात येत असून नागरिकांना आर्थिक लाभ मिळत आहे. आदिवासी समाजाद्वारे माेहफुल झाडाला ‘माऊली’ म्हणून ओळखले जाते. म्हणून त्यांनी या वृक्षांना जतन करून ठेवले आहे.
तरुण उद्याेजकांनी पुढे यावे
आदिवासींच्या अन्नात कायम माेहफुलांचा समावेश राहिला आहे. माेहापासून लाडू, मिठाई, ज्यूस आदी गाेष्टी तयार केल्या जातात. प्रक्रिया करून इतरही अनेक पाैष्टिक खाद्यपदार्थ तयार करता येतील. माेहफुलांसह इतर वनसंपदेसाठी प्रक्रिया उद्याेग स्थापन करून त्याचा प्रसार करता येईल. त्याची मार्केटिंग करून निर्यात करण्याची क्षमता निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे तरुण उद्याेजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डाॅ. गाेगुलवार यांनी केले.