गुन्हेगाराचा खून करण्यासाठी आले होते हल्लेखोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:10+5:302021-07-16T04:08:10+5:30
नागपूर : शस्त्र घेऊन दीड तास शहरात हंगामा करणारे असामाजिक तत्त्व ¦गुन्हेगाराचा खून करण्यासाठी पाचपावलीतील तांडापेठमध्ये आले होते. परंतु ...
नागपूर : शस्त्र घेऊन दीड तास शहरात हंगामा करणारे असामाजिक तत्त्व ¦गुन्हेगाराचा खून करण्यासाठी पाचपावलीतील तांडापेठमध्ये आले होते. परंतु गुन्हेगार पाचपावली ठाण्यात हजेरी देण्यासाठी गेल्यामुळे आरोपींचा बेत अयशस्वी होऊन मोठी घटना टळली.
‘लोकमत’ने याबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या घटनेतील सूत्रधारासह १२ आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये अब्दुल जुबेर अब्दुल जाहिद (२३), वसीम बेग रहमत बेग (१९), अरबाजुद्दीन काजी अलिमुद्दीन काजी (२०), अरबाज ऊर्फ समीर खान शकील खान (२२), प्रज्वल मुनीम टेंभुर्णे (२३) सोहेल अतिक सिद्दीकी (१८), चिराग ऊर्फ भावेश शंकरलाल शर्मा (२१), मोहनिश नजीर शेख (२१), आदित्य नरेश रेहपाडे (२३), कार्तिक राजू येलपूरवार (१९), अभय ताराचंद शेंडे (१९) तसेच राहुल दुबेलाल सोनेकर (२०) यांचा समावेश आहे. त्यांचे सात ते आठ साथीदार फरार आहेत. या घटनेत डझनभर बाईकवर शस्त्र, लाठ्या आणि रॉड घेऊन डबलसीट आलेल्या युवकांनी बुधवारी रात्री ८.३० ते रात्री १० दरम्यान हंगामा केला होता. शांतिनगर ते मारवाडी चौक, बंगाली पंजा या मार्गाने ते तांडापेठच्या प्रकाश पानठेल्याजवळ परत आले होते. ते फरार झाल्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली. लोकमतने गुरुवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. त्यांनी कावरापेठ येथील रहिवासी सूत्रधार अब्दुल जुबेर तसेच त्याच्या साथीदारांना अटक केली. प्रकाश पानठेल्याजवळ संशयित युवक कॅरम खेळतात. चार महिन्यापूर्वी जुबेरच्या भावाचा कॅरम खेळण्यावरून तांडापेठमधील कुख्यात गुन्हेगार शुभम खापेकरसोबत वाद झाला. शुभमने भावाला चापट मारल्यामुळे जुबेर नाराज होता. तो शुभमला धडा शिकवू इच्छित होता. बुधवारी रात्री जुबेरला मारवाडी चौकात आठ-दहा युवक त्याला नुकसान पोहोचविण्यासाठी आल्याचे समजले. शुभम कुख्यात गुन्हेगार असल्यामुळे जुबेरने त्याच्या खुनाची योजना आखली. जुबेर गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याने कावरापेठच्या नासुप्र मैदानात साथीदारांना गोळा केले. तेथे तलवार, लाठी, रॉड घेऊन दहीबाजार, मारवाडी चौक, बंगाली पंजा या मार्गाने ते तांडापेठमध्ये पोहोचले. शुभम तांडापेठमध्ये प्रकाश पानठेल्याजवळ राहतो. जुबेर आणि त्याच्या साथीदारांना शुभमचे घर शोधण्यात अडचण येत होती. त्यांना घरासमोर शुभमचे वडील पंढरी दिसले. त्यांनी पंढरीला धमकी दिली. त्यावेळी हजेरी देण्यासाठी शुभम पाचपावली ठाण्यात गेल्यामुळे तो आरोपींच्या हाती लागला नाही. त्याला शोधत असताना आरोपींना तांडापेठमध्ये पोलीस दिसले. त्यांना पाहून आरोपी फरार झाले. शुभमचे वडील तक्रार देण्यास टाळाटाळ करीत होते. परंतु लोकमतच्या वृत्तामुळे आणि प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलिसांनी दंगा, धमकी देणे तसेच शस्त्र विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
.......................