नागपुरात जन्मदात्रीला मारणाऱ्या दारुड्या भावाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:34 PM2018-06-26T14:34:16+5:302018-06-26T14:36:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या लहान भावाने हत्या केली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडल मिल चौकाजवळ सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली.
पंकज पायेश्वर विंचूरकर (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्याला त्याचा लहान भाऊ आरोपी नीरज पायेश्वर विंचूरकर (वय ३०, मॉडल मिल चौक नागपूर) याने मारले. मृत पंकजला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर त्याला कशाचेच भान राहत नव्हते. तो दारूच्या नशेत जन्मदात्या आईलाही मारहाण करीत होता. घरच्यांकडून तसेच शेजाऱ्यांकडून वारंवार समजूत घालूनही त्याचा फायदा होत नव्हता. रविवारी रात्री दारूच्या नशेत आल्यानंतर त्याने घरात भांडण सुरू केले. पहाटेपर्यंत ते सुरूच होते. ३ च्या सुमारास त्याने आईला मारणे सुरू केले. ते पाहून छोटा भाऊ नीरज मध्ये पडला. त्याने त्याला समजावण्याचे प्रयत्न केले असता पंकजने त्यालाही मारहाण केली. त्यामुळे रागाच्या भरात नीरजने जवळ पडलेला फरशीचा तुकडा उचलून पंकजच्या डोक्यात घातला. दारूच्या नशेत असलेल्या पंकजच्या डोक्यातून रक्ताची धार निघाली अन् तो जागीच गतप्राण झाला. हा अनपेक्षित गुन्हा घडल्याने नीरज सुन्न पडला. त्याने आाणि आईने शेजाऱ्यांना झालेला प्रकार सांगितला. शेजाऱ्यांनी गणेशपेठ पोलिसांना कळविला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नीरजला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, जागनाथ बुधवारी परिसरातील सावजी गल्लीत शुक्रवारी पहाटे अशीच घटना घडली होती. राजू रामभाऊ आमदे (वय ४२) याने त्याचा लहान भाऊ संजय रामभाऊ आमदे (वय ४१) याची हत्या केली होती. मृत संजय याला दारूचे भारी व्यसन होते. दारूच्या नशेत घरी येऊन तो पत्नी आणि आईला बेदम मारहाण करायचा. गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्याने आईला मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या मोठा भाऊ राजूने त्याला कपडे धुण्याच्या मोगरीने बदडले. परिणामी त्याचा मृत्यू झाला होता.