गळा दाबून पतीची हत्या
By admin | Published: May 17, 2017 02:00 AM2017-05-17T02:00:35+5:302017-05-17T02:00:35+5:30
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव करणाऱ्या स्वाती नितीन नायर
अपघाताचा बनाव : महिलेचे बिंग फुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव करणाऱ्या स्वाती नितीन नायर (वय २५) नामक महिलेविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. नितीन रमेश नायर (वय २७) असे मृताचे नाव आहे. रमेश नायर मूळचे केरळमधील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने ते बैतूल (मध्य प्रदेश) येथे स्थायिक झाले होते. स्वाती हिचे पहिले लग्न झाले अन् काडीमोडही झाला. त्यानंतर नितीनसोबत तिचे दुसरे लग्न झाले होते. नितीनने काही वर्षांपूर्वी भोपाळला टायरचे शोरूम सुरू केले अन् ते पत्नीसह तेथेच राहू लागले. औषधोपचाराच्या निमित्ताने नितीन आणि स्वाती नागपुरात आले होते. २९ एप्रिलला रात्री १० ते १०. ३० च्या सुमारास नितीनचा पायरीवरून पडल्याने मृत्यू झाल्याचा स्वातीने कांगावा केला होता. बजाजनगर पोलिसांनाही तशी माहिती दिली होती. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदनात गळा दाबून हत्या झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. नितीनचा भाऊ हरगोविंद रमेश नायर (वय २५) यानेही पोलिसांना स्वातीच्या प्रेमप्रकरणाचा उलगडा करणारे काही पुरावे दिले.
पोलीस पथक केरळकडे
नितीनचा खाली पडून मृत्यू झाल्याचा कांगावा करणारी स्वाती त्याच्या अंत्यसंस्कारानंतर लगेच आईवडिलांसोबत केरळला निघून गेली. धडधाकट नवऱ्याचा तिने एकटीने गळा कसा दाबला, नितीनने तिचा प्रतिकार का केला नाही, की यावेळी स्वातीसोबत दुसरा कोणता आरोपी होता, आदी प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस स्वातीला अटक करण्यासाठी केरळकडे निघाले आहे.