पेंटिंगचे काम न दिल्यावरून प्राणघातक हल्ला
By योगेश पांडे | Published: January 30, 2024 05:35 PM2024-01-30T17:35:49+5:302024-01-30T17:35:59+5:30
पोलिसांनी अनिलला अटक केली आहे.
नागपूर : पेंटिंगचे काम न दिल्याच्या कारणावरून आरोपीने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुरेश नारायण वगारे (३८, आंबेडकरनगर, गायत्रीमंदिराजवळ) असे जखमीचे नाव आहे. आरोपी अनिल अयोध्याप्रसाद पटेल (३१, भीमनगर, एमआयडीसी) हा त्यांना पेंटिंगचे काम मागत होता. मात्र वगारे यांनी त्याला काम दिले नाही. यावरून अनिल संतापला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याची वघारे यांच्यासोबत आयटी पार्क मार्गावरील श्रमविज्ञान संस्थेच्या कंपाऊंडजवळ भेट झाली. त्याने पेंटिंगचे काम न दिल्याच्या कारणावरून वाद उकरून काढला. त्याने वघारे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्यांच्या डोके तसेच चेहऱ्यावर दगडाने प्रहार केले. यात वघारे गंभीर जखमी झाले. समोरच आयटी कंपन्या असल्याने तेथे अनेक आयटी कर्मचारीदेखील होते. परिसरात खळबळ उडाली. वघारे यांना एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांचे भाऊ निलेश वघारे यांच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनिलला अटक केली आहे.
आयटी पार्कमध्ये गुंडांची दहशत
आयटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हातठेले आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तेथे गर्दी असते व त्यात अनेक गुंड प्रवृत्तीचे तरुणदेखील असतात. या परिसरात अनेकदा हाणामारीच्या घटना होतात. नागपुरातील महत्त्वाच्या आयटी कंपन्या असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असतात. मात्र पोलिसांकडून ही बाब गंभीरतेने घेण्यात येत नाही. अनधिकृत ठेल्यांना एकाप्रकारे संरक्षणच दिल्याने तेथे समाजकंटकांचा वावर वाढला आहे.