पत्नीच्या बॉसवर प्राणघातक हल्ला; कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 09:26 PM2022-02-08T21:26:01+5:302022-02-08T21:26:30+5:30
Nagpur News चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीने रिअल इस्टेट कंपनीच्या अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केला. अखेरच्या क्षणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे पत्नी व तिच्या बॉसचे प्राण वाचले.
नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीने रिअल इस्टेट कंपनीच्या अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केला. अखेरच्या क्षणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे पत्नी व तिच्या बॉसचे प्राण वाचले. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. रमेश भीमराव वाघ (३८, रा. कुतूबशाह नगर, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
रमेशची पत्नी इमामवाडा येथील रिअल इस्टेट कार्यालयात व्यवस्थापकपदी कार्य करते. रमेशविरोधात काही काळापूर्वी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीमुळेच हा गुन्हा दाखल झाल्याचा रमेशला संशय होता. शिवाय तो पत्नीच्या चारित्र्यावरदेखील शंका घेऊन लागला होता. नोकरी आणि मुलीची जबाबदारी यामुळे पत्नीने रमेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
पत्नीला धडा शिकविण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता रमेश पत्नीच्या कार्यालयात आला. पत्नीला शिवीगाळ करत तो भांडू लागला. दरम्यान, त्याने चाकू काढून पत्नीवर वार केले. पत्नीने टेबलाचा आधार घेत रमेशच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवले. दरम्यान, कार्यालयातील अधिकारी संजय सोनारकर (वय ५२) हे तिच्या मदतीसाठी धावले व त्यांनी रमेशला पकडण्याचा प्रयत्न केला. रमेशने सोनारकर यांच्यावरही हल्ला केला. त्याने सोनारकर यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविली व रमेशला पकडले. घटनेची माहिती मिळताच झोन - चारचे डीसीपी नुरुल हसन आणि इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रमेशला अटक करून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीची हत्या करण्याचाच उद्देश
रमेश कार्यालयात पत्नीची हत्या करण्याच्याच उद्देशाने आला होता. मात्र, सोनारकर व इतर कर्मचाऱ्यांमुळे त्याचा हेतू पूर्ण झाला नाही. ते लोक वेळेत समोर आले नसते तर अनर्थ झाला असता. पत्नीने दुसऱ्यांच्या सांगण्यावरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केल्यामुळे संतप्त झाल्याचे रमेशचे म्हणणे आहे.