नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला : जुन्या वैमनस्याचे पर्यवसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 08:20 PM2020-05-11T20:20:30+5:302020-05-11T20:23:05+5:30
तरुणांच्या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणावर प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात कळमन्यातील एका वाहतूक व्यावसायिकाचा मुलगा गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुणांच्या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणावर प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात कळमन्यातील एका वाहतूक व्यावसायिकाचा मुलगा गंभीर जखमी झाला. शिवम महेश जयस्वाल (वय २३) असे जखमी तरुणाचे नाव आहे. वाठोडा मार्गावरील उमिया कॉलनीत शिवम राहतो. त्याचे वडील ट्रान्सपोर्टर आहेत. शिवमसोबत त्याच भागात राहणाऱ्या पुलकित खोब्रागडेचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. काही दिवसांपूर्वी शिवमने पुलकितच्या भावाला बेदम मारहाण केली होती. तेव्हापासून या वादात भर पडली. त्यानंतर त्यांचे एकमेकांना धमकावणे, मारहाण करणे, असे प्रकार सुरू झाले.
या पार्श्वभूमीवर, शिवम रविवारी दुपारी ३ च्या सुमारास त्याच्या बुलेटने परिसरातून जात होता. ते पाहून आरोपी पुलकित, अमन कारेमोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्याला आवाज दिला. धोका लक्षात आल्यामुळे शिवमने आपली बुलेट दामटली. त्यामुळे आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावर तलवार, चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात जयस्वाल जबर जखमी झाला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. जखमी जयस्वालला रुग्णालयात नेण्यात आले. माहिती कळताच पोलीस तेथे पोहचले. जयस्वाल याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी पुलकित खोब्रागडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.
यापूर्वीही झाल्या तक्रारी
जयस्वाल आणि खोब्रागडे या दोघांमधील वादामुळे दोन्हींकडून एकमेकांविरुद्ध यापूर्वी पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या दोघांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांना समजही दिली होती. त्यांना कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र त्यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी वाढला आणि ही प्राणघातक हल्ल्याची घटना घडली.