बूथवर कमी पडल्यानेच विधानसभेत धक्का : भाजपचे संघटनात्मक मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:31 PM2019-11-21T22:31:39+5:302019-11-21T22:32:51+5:30
सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना भारतीय जनता पक्षातर्फे नागपुरात गुरुवारी शहर संघटनात्मक विषयांवर मंथन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना भारतीय जनता पक्षातर्फे नागपुरात गुरुवारी शहर संघटनात्मक विषयांवर मंथन करण्यात आले. ‘बूथ’पातळीवर कमी पडल्याने विधानसभा निवडणुकांत धक्का बसला. त्यामुळे ‘बूथ’वर कार्यकर्त्यांनी जास्त जोर देऊन संघटन मजबुतीवर भर दिला पाहिजे, अशा स्पष्ट सूचनाच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शहर भाजपची संघटनात्मक पातळीवरची ही पहिलीच बैठक होती.
गुरुवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात नागपूर शहर भाजपाची संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारपासून बूथ समितीच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. ‘बूथ’ मजबूत असेल तर निवडणुकांत पक्षाला यश मिळेल या उद्देशातून बूथप्रमुख मोहीम राबविण्यात आली होती. परंतु विधानसभेत ‘बूथ’ रचना असूनदेखील अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाला ‘बूथ’पातळीवर सक्षम व प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत. त्यामुळे मंडळाच्या नवीन कार्यसमितीमध्ये अशाच लोकांना स्थान मिळेल, असेदेखील यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागपुरात ‘बूथ’पातळीवरील निवडणुकांना शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.
संघटन पर्वांतर्गत होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबत यात पदाधिकारी व कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यात आले. भाजपमध्ये दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. संघटन पर्वांमध्ये जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता मेळावे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी निश्चित झाले. जिल्ह्यामध्ये सक्रिय सदस्यांची तपासणी अधिकारी निश्चित झाले आहेत. या बैठकीला शहराध्यक्ष प्रवीण दटके, प्रदेश सह निवडणूक प्रमुख आ.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मोहन मते, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, अशोक मेंढे, संजय भेंडे, महामंत्री संदीप जाधव, सुभाष पारधी, कल्पना पांडे, श्रीकांत देशपांडे, गिरीश देशमुख, अर्चना डेहनकर, मंडळ अध्यक्ष रमेश भंडारी, दिलीप गौर, महेंद्र राऊत, बंडू राऊत, संजय ठाकरे, किशन गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.