विधानसभा निवडणूक : आंतरराज्यीय सीमा सील करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 08:51 PM2019-09-19T20:51:09+5:302019-09-19T20:53:35+5:30

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पडावी, यासाठी आंतरराज्यीय सीमा सील करण्यात येईल.आंतरराज्यीय समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर एकमत झाले.

Assembly Election: Seals to Interstate Borders | विधानसभा निवडणूक : आंतरराज्यीय सीमा सील करणार

आंतरराज्यीय समन्वय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्न, गडचिरोली परीक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग, गोंदिया जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे,गडचिरोली पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी

Next
ठळक मुद्देचार राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पडावी, यासाठी आंतरराज्यीय सीमा सील करण्यात येईल. आंतरराज्यीय संयुक्त तपासणी नाक्यांवर सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात येतील. इतर राज्यातून होणारी रोकड व मद्यवाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्हीद्वारे नजरही ठेवली जाईल. आंतरराज्यीय समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर एकमत झाले.
लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही नागपूर विदर्भासह शेजारी राज्यांसोबत समन्वय राहावा, या उद्देशाने गुरुवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराज्यीय समन्वय समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी नागपूर विभाग, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील जिल्हा व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान उत्तम समन्वय साधण्यात आला होता. त्याच उत्स्फूर्तपणे राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता काळात जबाबदारी पार पाडावी. शेजारील राज्यातील जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि रेल्वे पोलीस दलाचे सहकार्य घ्यावे. त्यांच्यासोबत व्हॉटसअ‍ॅप ग्रूपसह विविध माध्यमांतून समन्वय साधावा, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने आचारसंहिता काळात चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिले.
निवडणूक काळात नक्षलवादी प्रभावित क्षेत्रावर विशेष लक्ष व नियंत्रण ठेवणे, आंतरजिल्हा संभाव्य मद्यविक्री आणि रोकड वाहतुकीवर नियंत्रण मिळविणे, आंतरजिल्हा सीमावर्ती भागात असलेल्या मतदान केंद्र आणि राजकीय पक्षांची कामगिरी आदींवर यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्हा, तहसील आणि मतदारसंघनिहाय निवडणूक अधिकारी यांच्यासोबत माहितीचे तात्काळ आदानप्रदान करण्याचे योग्य नियोजन करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील काही विवादित गावे आणि आंतरजिल्हा समन्वयावरही यावेळी भर देत असामाजिक तत्त्वावर आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
संयुक्त तपासणी नाक्यावर सशस्त्र पोलीस दल तैनात
निवडणूक काळात आंतरराज्यीय तपासणी नाके (चेक पोस्ट) सीसीटीव्ही, मोठ्या प्रमाणावर बॅरिकेट्स आणि संयुक्तरीत्या सशस्त्र सुरक्षा बलाच्या कमीत-कमी १० कर्मचाऱ्यांसह अद्ययावत ठेवावेत. दरम्यान मद्य अथवा रोख वाहतुकीबाबत शेजारील राज्यांच्या रेल्वे पोलीस, पोलीस आणि जिल्हा प्रशासनासह, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी जिल्हा निवडणूक प्रशासनाने समन्वय ठेवावा. या काळात रेल्वे, रस्ते आणि जल आदी विविध मार्गांनी मद्य व रोकड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य समन्वयातून संयुक्त कार्यवाही करावी. त्यासाठी धाबे, फार्महाऊस, रुग्णवाहिका, एटीएम रोकडची वाहतूक करणारी वाहने तसेच कंन्टेनर्सचीही कडक तपासणी करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिलेत.
आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर असलेल्या सशस्त्र पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे. असामाजिक तत्त्व, तडीपार असलेले, अटक वॉरंट जारी झालेले, नक्षलवादी यांच्याबाबत तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देशही यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

अधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी नागपूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्न, गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग, गोंदिया जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, गडचिरोली पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, गोंदिया पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, चंद्रपूर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, राजुरा सहायक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय धीवरे, तहसीलदार प्रताप वाघमारे, छत्तीसगडमधील राजनांदगावचे जिल्हाधिकारी जयप्रकाश मौर्य, पोलीस अधीक्षक कमलोचन, बिजापूर पोलीस अधीक्षक प्रकाश निकम, मध्य प्रदेशमधील छिंदवाडा पोलीस महानिरीक्षक सुशांतकुमार सक्सेना, जिल्हाधिकारी डॉ. श्रीनिवास शर्मा, पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय, बालाघाट अपर जिल्हाधिकारी शिवगोविंद मरकाम, पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी, तेलंगाणातील आदिलाबाद उपविभागीय अधिकारी सूर्यनारायणा, पोलीस अधीक्षक विष्णू वॉरीयर, आसिफाबाद पोलीस अधीक्षक मल्ला रेड्डी आदी उपस्थित होते.

Web Title: Assembly Election: Seals to Interstate Borders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.