विधानसभा हिवाळी अधिवेशन; व्हीआयपी मोमेंटसोबतच मोर्चेकऱ्यांचीही गर्दी वाढली, रेल्वेस्थानकावर तगडा बंदोबस्त
By नरेश डोंगरे | Published: December 18, 2022 10:03 PM2022-12-18T22:03:31+5:302022-12-18T22:07:25+5:30
स्थानिक तसेच बाहेरचे रेल्वे पोलीस तैनात, अकोल्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयत्न...
नरेश डोंगरे -
नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महत्वाचे, अतिमहत्वाचे व्यक्ती (आमदार, मंत्री) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची येथील रेल्वेस्थानकावर वर्दळ वाढली आहे. मोर्चेकरीही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या मुख्य तसेच अजनी रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.
तब्बल तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. सोमवारपासून या अधिवेशनाला प्रारंभ होत असला तरी अनेक मंत्री, आमदार रविवारीच नागपुरात दाखल झाले आहेत. विविध विभागाचे अधिकारी आणि नेत्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येत नागपुरात पोहचणे सुरू आहे. मुंबई, पुण्यांकडील अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपी विमानाने आणि आलिशान खासगी वाहनाने येथे येत असले तरी खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक व्हीआयपी मात्र आपापल्या कार्यकर्त्यांसह रेल्वेनेच नागपुरात दाखल होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर व्हीआयपी मोमेंट वाढली आहे. ती पुढचे दोन आठवडे वाढतच जाणार आहे.
अशात आपल्या न्याय मागण्या सरकार दरबारी रेटण्यासाठी विविध संघटनांचे मोर्चेही सोमवारपासून अधिवेशनावर धडकणार आहेत. त्यामुळे संबंधित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते (मोर्चेकरी) मोठ्या संख्येत नागपुरात येणे सुरू झाले आहे. अशात येताना किंवा जाताना मोर्चेकरी अन् व्हीआयपी समोरासमोर आल्यास घोषणाबाजी, शाईफेकीसारखी कोणती अनुचित घटना घडू शकते. तसे होऊ नये म्हणून रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ठाकरे आणि शिवसेना गटाचे दोन नेते एकाचवेळी अकोला रेल्वेस्थानकावर आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती नागपुरात होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहे.
प्रत्येक मोमेंटवर राहणार लक्ष -
रेल्वेने जाणारे - येणारे व्हीआयपी, व्हीव्हीआयपी तसेच मोर्चेकरी एकाच वेळी स्थानकावर येऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक व्हीआयपीच्या मोमेंटवर लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वेस्थानकावर येण्यापासून तो रेल्वेेत बसण्यापर्यंत आणि बाहेरगावून रेल्वेस्थानकावर उतरण्यापासून तो येथून ते सुरक्षीत बाहेर जाण्यापर्यंतच्या घडामोडीचे पूर्वनियोजन केले जाणार आहे.