नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३०,२१० शेतकऱ्यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:59 AM2019-11-29T10:59:02+5:302019-11-29T11:00:33+5:30
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मिळालेल्या १३ कोटी ३६ लाख रुपये मदत निधीचे ९९ टक्के वाटप करण्यात आले आहे, एकूण ३०,२१० शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मिळालेल्या १३ कोटी ३६ लाख रुपये मदत निधीचे ९९ टक्के वाटप करण्यात आले आहे, एकूण ३०,२१० शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने मदतीसाठी हेक्टरी ८ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे जाहीर केले तर फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानासाठी ४६ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठविण्यात आला. राज्यशासनाने पहिल्या टप्प्यात १३ कोटी ३६ लाखाचा निधी दिला. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केल्यावर दुसऱ्या टप्प्यातील निधी शासनाकडून मिळणार आहे. १४ नोव्हेंबरला हा निधी मिळाला. २८ तारखेपर्यंत ९९.५४ टक्के वाटप झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मौदा, काटोल, रामटेक, पारशिवनी, कळमेश्वर तालुक्यात १०० टक्के वाटप झाले. या मदत वाटपात कामठी तालुका मात्र मागेच आहे. कामठी तालुक्यात आतापर्यंत ८२.९३ टक्के रकमेचे वाटप करण्यात आले.
एकूण ३०,२१० शेतकऱ्यांना ही मदत मिळाली असून यामध्ये सर्वाधिक ८८४३ शेतकरी नरखेड व ८१५२ शेतकरी हे काटोल तालुक्यातील आहेत. त्यानंतर कळमेश्वर ५३५७, सावनेर ४५४१ आणि मौदा तालुक्यातील १६८८ शेतकºयांचा समावेश आहे.