सहायक फौजदार अडकला
By admin | Published: May 14, 2016 03:07 AM2016-05-14T03:07:03+5:302016-05-14T03:07:03+5:30
मारुती कार चालकाकडून १५०० रुपयांची लाच उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहायक फौजदाराला (एएसआय) भ्रष्टाचार विरोधी पथकाने जेरबंद केले.
१५०० रुपयांची लाच : एसीबीची कारवाई
नागपूर : मारुती कार चालकाकडून १५०० रुपयांची लाच उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहायक फौजदाराला (एएसआय) भ्रष्टाचार विरोधी पथकाने जेरबंद केले. प्रकाश दमडूजी राठोड (वय ४८) असे त्याचे नाव आहे.
तो इंदोरा भागात कार्यरत होता. तक्रारकर्ते ९ मे रोजी लग्नाकरिता भंडारा येथून आपली मारुती ओम्नी कारने नागपुरात आले होते. पारडी नाक्याजवळ वाहतूक पोलिसांनी कारचालकावर चलान कारवाई केली. ही कार ताब्यात ठेवून कोर्टात दंड भरण्यास सांगितले. त्यावरून तक्रारकर्त्याने न्यायालयात एक हजार रुपये दंड भरला आणि त्याची पावती घेऊन ११ मे रोजी वाहतूक शाखेच्या इंदोरा कार्यालयात कार सोडविण्याकरिता गेले. तेथे कार्यरत असलेले एएसआय राठोड यांनी दंड भरल्याची पावती पाहिली. मात्र कार सोडण्याकरिता दोन हजारांची मागणी केली. नकार दिल्यामुळे राठोडने मारुती ओम्नी कारवर निलंबन नोटीस लिहिला.
त्यावर सहायक पोलीस निरीक्षकांची स्वाक्षरी घेऊन तक्रारदारास मेमो दिला. परिणामी तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथील कार्यालयात १२ मे रोजी तक्रार नोंदवली. पोलीस उपायुक्त संजय दराडे, अतिरिक्त अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या नेतृत्वात कारवाईचा सापळा रचण्यात आला. (प्रतिनिधी)
भंडाऱ्याचे पथक नागपुरात
कारवाईसाठी भंडारा एसीबीचे पथक नागपुरात पोहचले. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने राठोडला गाठून लाचेची रक्कम कमी करण्याची मागणी केली. त्याने १५०० रुपये घेण्याची तयारी दाखवली. ही रक्कम स्वीकारताच पोलीस उपअधिक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, हवलदार बाजीराव चिंधालोरे, नायक अशोक लुलेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, मनोज पंचबुध््दे , अश्विनकुमार गोस्वामी यांनी राठोडच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.