तीस हजारांची लाच, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अडकला जाळ्यात
By योगेश पांडे | Updated: March 28, 2025 00:09 IST2025-03-28T00:08:33+5:302025-03-28T00:09:49+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

तीस हजारांची लाच, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अडकला जाळ्यात
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तीस हजारांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधित आरोपी हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
रविंद्र मनोहर साखरे (५४, वानाडोंगरी) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सहायक साखरेकडे होता. गुन्ह्यातील संशयित युवकाला आरोपी न बनवण्यासाठी तसेच कोणतीही फौजदारी कारवाई न करण्यासाठी साखरे याने तीस हजार रुपयाची लाच मागितली. मात्र, त्या युवकाला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्याने एसीबीला संपर्क केला. एसीबीच्या पथकाने त्याच्या तक्रारीची शहानिशा केली व त्यानंतर सापळा रचला.
तरुणाने ठरल्याप्रमाणे साखरेला तीस हजार रुपये दिले. त्यावेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. एसीबीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस निरीक्षक आशीष चौधरी, वर्षा मते, अस्मिता मल्लेलवार, वंदना नगराळे, अनिल बहिरे, प्रफुल्ल भातुलकर, होमेश्वर वाईलकर, विजय सोळंकी यांच्या पथकाने ही कारवाई केली.