ग्रामीण पोलीस मुख्यालयात सहायक पोलीस उपनिरीक्षकाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 09:24 PM2022-07-23T21:24:53+5:302022-07-23T21:26:39+5:30
Nagpur News शनिवारी ग्रामीण पोलीस मुख्यालयात सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली.
नागपूर : शनिवारी ग्रामीण पोलीस मुख्यालयात सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शशिकुमार शेंडे (४५, गोधणी) असे गळफास घेतलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे.
शशिकुमारची पत्नी ज्योती या पोलीस अधीक्षक कार्यालयात कनिष्ठ लिपिक आहेत. शुक्रवारी रात्री शशिकुमारने ज्योती यांच्या मोबाइलवर संपर्क साधून बाहेर जेवण करणार असल्याचे कळविले. काही वेळानंतर ज्योती यांनी शशिकुमारच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शनिवारी दुपारी काही पोलीस कर्मचाऱ्यांना शशिकुमार यांची दुचाकी सभागृहासमोर उभी असल्याचे दिसले. त्यांनीसुद्धा शशिकुमारच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचारी सभागृहात गेले असता शशिकुमार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. लगेच त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली.
कपिलनगर पोलिसांनाही घटनेची सूचना देण्यात आली. कपिलनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. शशीकुमार यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
.............