पंचायत समितीला रिक्त पदाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:34+5:302020-12-08T04:08:34+5:30
कळमेश्वर : पंचायत समितीला सध्या रिक्त पदाचे ग्रहण लागले असून, मंजूर ६५ पदांपैकी २१ पदे रिक्त आहेत. या रिक्त ...
कळमेश्वर : पंचायत समितीला सध्या रिक्त पदाचे ग्रहण लागले असून, मंजूर ६५ पदांपैकी २१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदाचा सर्वाधिक फटका शिक्षण विभागाला बसला आहे. परिणामी, इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढत आहे. ही रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी केली जात आहे.
पंचायत समितींतर्गत ५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात १०५ गावे समाविष्ट असून, यापैकी ८३ गावे महसुली तर २२ गावे रिठी आहेत. या गावातील नागरिकांसाठी तसेच गावाच्या विकासाकरिता शासनाकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जातात. परंतु त्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता पुरेसे कर्मचारी नसल्याने पंचायत समिती प्रशासनाला शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविताना तारेवरची कसरत करावी लागते.
पंचायत समितीमध्ये कृषी विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, लेखा विभाग, पंचायत विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग या विभागासाठी ६५ पदे मंजूर आहेत. यापैकी शिक्षण विभागातील महत्त्वाचे गटशिक्षणाधिकारी पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. तर चार ज्येष्ठ व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांपैकी एकच पद भरले असून, उर्वरित तीन पदे रिक्त आहेत. कार्यरत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडेच गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी १, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी १, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी १, वरिष्ठ सहायक (लेखा) १, पशुधन पर्यवेक्षक १, पट्टीबंधक १, यांत्रिकी १, आरोग्य पर्यवेक्षक १, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १, सहायक आरेखक १, अनुरेखक १, वाहन चालक १ अशी पदे रिक्त आहेत. तसेच कनिष्ठ सहायकाच्या मंजूर १० पदांपैकी ४ पदे तर परिचरकांची ३ पदे रिक्त आहेत.
....
पंचायत समितीमधील रिक्त पदांबाबत मासिक सभेत ठराव घेऊन जिल्हा परिषदेला पाठविला आहे. तसेच तात्काळ पदे भरण्यासंबंधी पाठपुरावा सुरु आहे.
- श्रावण भिंगारे, सभापती, पंचायत समिती, कळमेश्वर.