शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन मोदींच्या स्मरणातही नाही

By admin | Published: May 16, 2017 02:26 AM2017-05-16T02:26:54+5:302017-05-16T02:26:54+5:30

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे २० मार्च २०१४ ला ‘चाय पे चर्चा’वर शेतकऱ्यांशी संवाद साधला...

The assurance given to farmers is not even in memory of Modi | शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन मोदींच्या स्मरणातही नाही

शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन मोदींच्या स्मरणातही नाही

Next

शिवाजीराव मोघे : १८ व १९ ला शेतकऱ्यांचे दिल्लीत उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे २० मार्च २०१४ ला ‘चाय पे चर्चा’वर शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांची वाईट अवस्था सुधारण्यासाठी विविध योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. भाजपा सरकारला तीन वर्षे लोटूनही एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पंतप्रधान मोदींच्या स्मरणातही नाही. त्यांना त्याची आठवण देण्यासाठी येत्या १८ व १९ ला दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकरी उपोषण करणार असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिलीत आणि लोकांची भरभरून मतेही मिळविली. शेतकऱ्यांच्या मालाला नफ्याच्यावर ५० टक्के हमीभाव, शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना राष्ट्रीयकृत बँकाकडून अल्पव्याजदरात कर्ज, कापूस होत असलेल्या यवतमाळ, अमरावती भागात त्यावरील उद्योग, कृषिमालाच्या दळवणवळणासाठी स्वतंत्र रेल्वेची सुविधा, कृषिमाल साठविण्यासाठी खेड्यापाड्यात गोडाऊन, नद्या जोड प्रकल्प अशी एक ना अनेक आश्वासने त्यांनी दिली.
शेतकरी आत्महत्या मागच्या सरकारचे पाप असल्याची टीका करून यापुढे कुणीही आत्महत्या करणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी दिला होता. मात्र तीन वर्षे लोटूनही मोदींनी एकाही आश्वासनाची पूर्ती केली नसल्याचा आरोप मोघे यांनी यावेळी केला. केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या काळात महाराष्ट्रात हजारो आत्महत्या झाल्या असून शेतकऱ्यांची अवस्था आणखी वाईट झाली आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेल्या देशातील ३३ जिल्ह्यातच आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात फडणवीस सरकारने ‘काँग्रेसचे धरण’ म्हणून निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे सहा लाख हेक्टर शेती सिंचनापासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.पंतप्रधानांना आठवण देण्यासाठी आर्णी तालुका काँग्रेस कमिटी व आर्णी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे गेली दोन वर्षे दाभडी व आर्णी येथे प्रतिकात्मक चाय की चर्चा हे आंदोलन केले. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने आता थेट दिल्लीतच आंदोलन घेण्यात येत असल्याचे मोघे यांनी सांगितले. जवळपास २०० शेतकरी या लाक्षणिक उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपाची संवाद यात्रा ‘बकवास’
भाजपातर्फे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज्यात लवकरच संवाद यात्रा काढली जाणार आहे. याविषयी विचारले असता शिवाजीराव मोघे यांनी भाजपाची संवाद यात्रा ‘बकवास’ असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे हेच या यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने या सरकारची मानसिकता स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली.
आश्वासन पूर्ण करण्यात आणि शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने लोकांचे मन वळविण्यासाठी ही यात्रा काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: The assurance given to farmers is not even in memory of Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.