नागपूरकरांमध्ये वाढला १० टक्क्याने अस्थमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:49 AM2019-08-23T11:49:21+5:302019-08-23T11:49:49+5:30
धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धुळीमुळे दमा होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असते. सध्या नागपुरात मेट्रो, सिमेंट रस्ते व इमारतीचे बांधकाम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. विनित निरंजने उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, दम्यावर श्वसनमार्गे घेण्यात येणारी प्रभावी औषधे (इन्हेलर) आहेत. परंतु या औषधांना घेऊन अनेक गैरसमज आहे. हे गैरसमजच हा आजार गंभीर होण्यास कारणीभूत ठरत आहे. जर या उपकरणांचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर परिस्थती बिघडू शकते. राज्यात ४० ते ६९ वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुनाट श्वसनाच्या आजाराचे कारण पहिल्या क्रमांकावर आहे. १५ ते ३९ या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणामध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९९० मध्ये व्यक्तींच्या मृत्यूचे व अपंगत्वाचे नवव्या क्रमांकाचे कारण असलेली ‘सीओपीडी’ हे २०१६ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे कारण म्हणून समोर आले आहे. यातून श्वसनाच्या आजाराचे ओझे आणि त्यांच्या नियमनाची गरज रेखांकित होते.
डॉ. विनित निरंजने म्हणाले, भारतातील फिजिशियनचे ज्ञान आणि ‘इन्हलेशन थेरपी’ याचा आढावा घेणाऱ्या एका अभ्यासातून असे लक्षात आले की, इन्हेलरचा चुकीचा वापर केला जात असल्याने श्वसनाच्या आजारावरील उपचारांचे सकारात्मक परिणाम कमी झाल्याचे दिसून आले आहे. दम्याच्या नियमनाचे शिक्षण व त्याबद्दल जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. साधारण ८० टक्के रुग्ण इन्हेलरचा योग्य वापर करत नसल्याचेही आढळून आले आहे. रुग्णांना इन्हेलर वापरण्याचा प्रशिक्षणावर जोर देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.