फटाक्यांच्या धुरामुळे नागपुरात दमाच्या रुग्णांमध्ये २० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 09:58 PM2019-10-30T21:58:19+5:302019-10-30T22:03:19+5:30

फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीतून विषारी वायू व धातूंच्या उत्सर्जनामुळे शहरात श्वसनाच्या आजारात झपाट्याने वाढ झाली आहे. दमाच्या रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढली असून श्वसनाच्या आजारांसह त्वचा व डोळ्यांच्या आजारात वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी नमूद केले आहे.

Asthma patients increase by 20% in Nagpur due to fire crackers | फटाक्यांच्या धुरामुळे नागपुरात दमाच्या रुग्णांमध्ये २० टक्के वाढ

फटाक्यांच्या धुरामुळे नागपुरात दमाच्या रुग्णांमध्ये २० टक्के वाढ

Next
ठळक मुद्देश्वसनासह त्वचा व डोळ्यांचे आजारही वाढलेप्रदूषण नियंत्रणाची नितांत गरज : काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसामुळे आधीच ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे हवामानात बदल होऊन आजारांचे प्रमाण वाढले असताना दिवाळीच्या फटाक्यांनी त्यात आणखी भर घातली आहे. फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीतून विषारी वायू व धातूंच्या उत्सर्जनामुळे शहरात श्वसनाच्या आजारात झपाट्याने वाढ झाली आहे. दमाच्या रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढली असून श्वसनाच्या आजारांसह त्वचा व डोळ्यांच्या आजारात वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी नमूद केले आहे.
दिवाळीच्या काळात दरवर्षी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे निघणाऱ्या धुरातून प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साईडसह इतर विषारी वायूंचे उत्सर्जन होते. यासह शिसे, कॅडमियम यासारख्या धातूंचे उत्सर्जन होऊन धुलीकणात (पार्टिक्युलेट मॅटर) वाढ होते. यामुळे कान, नाक, घसा, डोळे व त्वचेचे आजार बळावत असल्याचे दिसून येते. हे धुलीकण शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करतात. यावर्षीही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. श्वासरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी नमूद केलेल्या माहितीनुसार, शहरात अस्थमाच्या रुग्णांच्या प्रमाणात २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फटाक्यांच्या विषारी वायूमुळे डोळ्यांची जळजळ, कान आणि त्वचेवर खाज सुटण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्दी आणि खोकला यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
डॉ. अरबट यांनी सांगितले, फटाक्यांमुळे सर्वाधिक त्रास दमाच्या रुग्णांना सहन करावा लागतो. एकतर घरातील साफसफाईदरम्यान उडणाऱ्या धुरामुळे त्रास होतो. यानंतर फटाक्यांचा धूर आणखी त्रासदायक ठरतो. यामुळे ज्यांना आधीच दमाचा त्रास आहे, त्यांचा आजार १०० टक्के बळावतो. ज्यांना नाही आहे, त्यांना हा आजार होण्याची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापासून बचावासाठी साफसफाई करणाऱ्यांनी तोंडाला स्वच्छ कापड बांधूनच स्वच्छता करावी. रुग्ण असतील तर त्यांनी या जागेपासून दूरच राहावे किंवा शक्य नसेल तर नेहमी कापड तोंडाला बांधून ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर शहरात धुलीकणांचे प्रदूषण सर्वाधिक आहे. हवामान बदलामुळे व्हायरल आजारांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यात फटाक्यांच्या धुराने अधिक धोका निर्माण केला आहे. वाहनांच्या प्रदूषणापेक्षा हे प्रदूषण अधिक त्रासदायक ठरणारे असल्याचे डॉ. अरबट यांनी नमूद केले.
फटाके फोडू नका असे आवाहन दरवर्षी केले जाते, मात्र लोकांना रोखणे कठीण आहे. त्यामुळे आपणच यापासून अलिप्त राहून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. शासनाने प्रदूषणावर नियंत्रणासाठी काहीतरी कठोर उपाय करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

लहान मुलांना सांभाळा
पावसाळी ढगाळ वातावरणामुळे फटाक्यांचा धूर वर न जाता खालीच राहतो. त्यामुळे गेल्या दोन दिवसात श्वसनाच्या रुग्णात वाढ झाली आहे. फटाक्यांच्या धुरातून सल्फरडाय ऑक्साईड, कॉर्बन मोनाक्साईड आदी वायूंचे उत्सर्जन होते. सध्या वातावरणातील बदल व फुटलेले फटाके यांच्यामुळे वातावरणात बदल झाल्याने श्वसनाचे आजार वाढले. दम लागणे, घशात सूज येणे, सर्दी व प्रचंड शिंका येणे, अ‍ॅलर्जिक खोकला, छातीत खरखर आदी आजार बळावले आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होतो. बाळांची श्वसननलिका नाजूक असल्याने त्यांच्यावर परिणाम होतात. त्यामुळे लहान मुलांची सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
डॉ. राजेश स्वर्णांक, श्वासरोग तज्ज्ञ

धुलीकणांच्या प्रमाणात धोकादायक वाढ
ग्रीन व्हिजील संस्थेतर्फे दिवाळीच्या दिवशी २७ व २८ ऑक्टोबर रोजी सिव्हिल लाईन्सच्या जीपीओ चौकात प्रदूषणाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानुसार धुलीकणांच्या प्रमाणात धोकादायकरीत्या वाढ झाल्याचे आढळून आले. कौस्तुभ चटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणात धुलीकणांची (पार्टिक्युलेट मॅटर - पीएम २.५) मर्यादा ६० मायक्रोग्रॅम/मीटर क्युब असायला हवी. मात्र या दोन दिवसात ती ३२० मायक्रोग्रॅम/मीटर क्युबपर्यंत वाढून धोकादायक स्तर गाठला होता. याशिवाय पीएम-१० ने १०० मायक्रोग्रॅम/मीटर क्युबची मर्यादा ओलांडून १५१ मायक्रोग्रॅम/मीटर क्युबचा स्तर गाठला होता. हा परिसर वृक्षाच्छादित असतानाही ही धोकादायक स्थिती गाठली असल्याने इतर परिसरात हा स्तर कित्येक पटीने वाढला असेल, अशी चिंता चटर्जी यांनी व्यक्त केली.

Web Title: Asthma patients increase by 20% in Nagpur due to fire crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.