संकुचित विचारसरणीमुळे ज्योतिषशास्त्राला कमीपणा आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:51 PM2020-01-02T23:51:56+5:302020-01-02T23:55:54+5:30
ज्योतिषशास्त्राला एका चौकटीत बंदिस्त करण्यात आले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या शास्त्राला कमीपणा आला आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.उमा वैद्य यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्योतिषशास्त्र हे अभ्यासाचे शास्त्र आहे. परंतु अनेकांना या शास्त्राचे महत्त्व व स्वरुपच कळालेले नाही. नोकरी, लग्न, अपत्यप्राप्ती याच गोष्टीसाठी लोक याचा उपयोग करताना दिसून येतात. ज्योतिषशास्त्राला एका चौकटीत बंदिस्त करण्यात आले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या शास्त्राला कमीपणा आला आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.उमा वैद्य यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेविका समितीच्या प्रथम प्रचारिका सिंधुताई फाटक यांच्या स्मरणार्थ संघमित्रा प्रतिष्ठानतर्फे सिंधू सन्मान प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
धंतोली येथील अहल्या मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, संघमित्रा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुप्रिया काळे या उपस्थित होत्या. विविध क्षेत्रात लक्षणीय प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांना सिंधू सन्मान प्रदान करण्यात येतो. बेकरीच्या व्यवसायातून स्वत:ची ओळख निर्माण करणाºया नाशिकच्या ८४ वर्षीय गंगुताई धामणकर, नागपूरच्या पंचांग अभ्यासिका विद्याताई राजंदेकर, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात करोडपती बनणाºया पहिल्या महिला बबिता ताडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आजकालचे पुरस्कार चंगळवादाकडे झुकलेले दिसून येतात. चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करताना खरोखर समाधान देणारे पुरस्कार फार थोडके राहिले आहेत. ज्योतिषशास्त्र हे योग्य पद्धतीने अभ्यासायचे शास्त्र आहे. ते कळले नाही म्हणून टीका करणे योग्य नाही. एखाद्याने हे शास्त्र शिकले तर आता त्याचे नवीन दुकान सुरू होईल, अशी भाषा वापरली जाते. या शास्त्राचे महत्त्व कळाले नसल्यानेच अशा प्रतिक्रिया येतात, असे डॉ.उमा वैद्य म्हणाल्या. यावेळी तिन्ही पुरस्कार विजेत्यांच्या प्रकट मुलाखतीदेखील घेण्यात आल्या. मेधा नांदेडकर, सीमा देशपांडे, आदिती देशमुख यांनी या मुलाखती घेतल्या. आयुष्यात अनेक संकट आली. परंतु साखर नाही म्हणून गूळ वापरण्यासारखा प्रकार आम्ही कधीच केला नाही, असे प्रतिपादन गंगुताई धामणकर यांनी केले. पंचांग हे कुणीही अभ्यासू शकते. कुठलेही काम करण्याची शुभ वेळ हे थोतांड नसून त्यामागे शास्त्र असल्याचे मत विद्या राजंदेकर यांनी व्यक्त केले. निराश झाल्यावर परिस्थितीला दोष न देता त्यावर मात करण्यासाठी जिद्द दाखविली पाहिजे, असे आवाहन बबिता ताडे यांनी केले.