लक्षणे नसलेले रुग्ण ठरू शकतात ‘सूपरस्प्रेडर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 10:33 AM2022-01-03T10:33:49+5:302022-01-03T10:44:26+5:30
भारतात लक्षणे असलेल्या ३३ पैकी एकाच रुग्णाची प्रत्यक्ष चाचणी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे साहजिकच अनेकांना संसर्ग झाल्याची साधी कल्पनादेखील येत नसून लक्षणे नसलेले हेच लोक ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात.
नागपूर : देशात कोरोनाबरोबरच ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ‘ओमायक्रॉन’ची लक्षणे सौम्य असल्याने अनेक जण तपासणीसाठीच बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. गणितीय मॉडेलच्या माध्यमातून या स्थितीवर अभ्यास सुरू असून भारतात लक्षणे असलेल्या ३३ पैकी एकाच रुग्णाची प्रत्यक्ष चाचणी होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. यामुळे साहजिकच अनेकांना संसर्ग झाल्याची साधी कल्पनादेखील येत नसून लक्षणे नसलेले हेच लोक ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात.
‘कोरोना’च्या पहिल्या दोन लाटांदरम्यान गणितीय मॉडेलचा अंदाज बऱ्याअंशी खरा ठरला होता. ‘ओमायक्रॉन’मुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात येत असून यासंदर्भात जगभरात अभ्यास सुरू आहे. परंतु ‘आयआयटी-कानपूर’ येथील प्रोफेसर डॉ. मनिंदर अग्रवाल यांनी गणितीय मॉडेल विकसित केले होते. परंतु यासोबतच त्यांनी देशातील विविध राज्ये तसेच जगभरातील अनेक देशांमध्ये झालेल्या सीरो सर्वेक्षणांवरदेखील अभ्यास केला. यात संसर्ग झालेले नागरिक आणि ज्यांना कोरोना होऊन गेला व कळलेदेखील नाही, असा रुग्णांच्या आकडेवारीचेदेखील त्यांनी विश्लेषण केले. यातील अभ्यासातून त्यांनी अंदाज मांडला आहे की भारतासह जगातील बहुतांश देशांमध्ये ‘मिसिंग केसेस’चे प्रमाण खूप जास्त आहे.
अमेरिकेत प्रत्यक्ष रुग्ण व चाचणी झालेले रुग्ण यांचे गुणोत्तर ४.५ : १ असे होते. युनायटेड किंग्डम व दक्षिण अफ्रिकेत हेच गुणोत्तर अनुक्रमे ३.२ : १ व १७ : १ असू शकते तर भारतात हेच प्रमाण ३३ : १ असण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे चाचणीच न झालेल्या अशा ‘सुपरस्प्रेडर’मुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढण्याची भीती आहे. हीच बाब लक्षात येऊन वैद्यकीय तज्ज्ञांकडूनदेखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.