४१ अंशासह अकाेला देशात सर्वाधिक तापलेले
By निशांत वानखेडे | Published: March 26, 2024 07:45 PM2024-03-26T19:45:00+5:302024-03-26T19:45:53+5:30
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दिवसाचा पारा ४० अंशाच्या पार गेला असून ४१.५ अंश कमाल तापमानासह अकाेला हे देशातील सर्वाधित तापलेले शहर ठरले आहे.
नागपूर : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विदर्भाला सूर्याचा प्रकाेप सहन करावा लागेल, असा अंदाज दिसून येत आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दिवसाचा पारा ४० अंशाच्या पार गेला असून ४१.५ अंश कमाल तापमानासह अकाेला हे देशातील सर्वाधित तापलेले शहर ठरले आहे.
ढगाळ वातावरण हटल्यानंतर विदर्भाचे तापमान दिवसागणिक वाढत चालले आहे. अंश-अंशाची भर पडत विदर्भातील जिल्हे पुन्हा तापमानाची उच्चांकी गाठायला सज्ज आहेत. गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या बहुतेक दिवसात अकाेला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर ही शहरे तापमानवाढीच्या जागतिक क्रमावारीत हाेते. यंदाही तिच स्थिती दिसून येत आहे. अकाेला देशात सर्वात तापदायक ठरले तर त्याखालाेखाल वाशिमचाही पारा ४१.४ अंशावर पाेहचला आहे. याशिवाय अमरावती, बुलढाणा, ब्रम्हपुरी, बुलढाणा, यवतमाळ या शहरांनी ४० अंशाचा आकडा पार केला आहे. आश्चर्य म्हणजे सध्यातरी चंद्रपूरचा पारा सरासरीखाली म्हणजे ३८.६ अंशावर आहे. ३८ अंशासह गाेंदियासुद्धा सरासरीच्या खाली आहे.
तापमान वाढल्याने उन्हाच्या झळा प्रचंड वाढल्या आहेत. दुसरीकडे नागपूरमध्ये दिवसाचा पारा अंशत: वाढत ३९ अंशावर गेला आहे. दिवसभर आकाश काहीसे ढगांनी झाकले हाेते पण सूर्याचा ताप अधिक तीव्र असल्याने उकाड्याची जाणीव तीव्र हाेत आहे.
पाच दिवसात २ ते ४ अंशाने वाढेल
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसात विदर्भासह मध्य भारतात कमाल तापमान २ ते ४ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याचा व अधिक सतर्क राहण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.